जे.जे. रुग्णालयात ३४ वर्षांपूर्वी गोळीबार करणार्या दाऊदच्या गुंडाला अटक !
मुंबई – वर्ष १९९२ मध्ये जे.जे. रुग्णालयात करण्यात आलेल्या गोळीबाराप्रकरणी पोलिसांनी प्रमुख आरोपी त्रिभुवन सिंह (वय ६२ वर्षे) याला अटक केले आहे. बहीण हसीना पारकर हिचा पतीवरील आक्रमण करणार्यांना ठार मारण्यासाठी दाऊद इब्राहिम याच्या गुंडांनी हा गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये २ पोलिसांसह अन्य काही व्यक्तींचा मृत्यू झाला होता.
जुलै १९९२ मध्ये हसीना पारकर हिचा पती इब्राहिम पारकर नागपाडा येथील त्याच्या हॉटेलमध्ये बसला असतांना गवळी टोळीतील शैलेश हळदणकर आणि बिपीन शेरे यांनी त्याच्यावर गोळीबार केला. गोळीबार करून पळून जातांना हळदणकर आणि शेरे यांना नागरिकांनी पकडून मारहाण केली. यामध्ये घायाळ झालेल्या दोघांना जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. दाऊद टोळीतील सुनील सावंत, सुभाषसिंह ठाकूर, श्यामकिशोर गारिकापट्टी यांच्यासह अन्य गुंडांनी रुग्णालयात घुसून गोळीबार केला होता. या वेळी शैलेश हळदणकर याचा जागीच मृत्यू झाला, तर बिपीन शेरे गंभीर घायाळ झाले होते. या वेळी सुरक्षेसाठी असलेले पोलीस शिपाई चिंतामण जयस्वाल आणि केवलसिंह भागवत यांचाही गोळीबारात मृत्यू झाला होता. काही वैद्यकीय कर्मचारीही या वेळी घायाळ झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी २६ जणांना अटक केली होती.