संपादकीय : निर्णायक ‘बीबीसी ट्रायल’ !
भारत आणि हिंदु यांच्याविषयीचा द्वेष नसानसांत भिनलेल्या जागतिक वृत्तवाहिनीचे दुसरे नाव म्हणजेच ‘बीबीसी – ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पाेरेशन’ ! तसे तर ‘द गार्डियन’, ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘टाइम’, ‘अल्-जझीरा’ आदी पाश्चात्त्य प्रसारमाध्यमे एकाच माळेतील मणी आहेत; परंतु ‘बीबीसी’ या माळेतील मुख्य मणी होय ! भारतासंदर्भात खोटी कथानके प्रसृत करणार्यांसाठी वैचारिक विष पुरवण्यात ‘बीबीसी’ अग्रक्रमावर आहे. ‘भारत म्हणजे गरिबांचा, लाचार जनतेचा आणि ‘सैतानी धर्मा’चा (सनातन धर्माचा)’, अशा प्रकारे विकृत नि निराधार चित्र तिने उभे केले आहे. १०२ वर्षांपूर्वी ‘बीबीसी’चा जन्म झाला. या जागतिक वैचारिक गुंडाचा विचार करण्याचे प्रयोजन, म्हणजे या वृत्तवाहिनीच्या मानसिकतेची चिरफाड करणारी ‘डॉक्युमेंट्री’ २५ ऑक्टोबरला जगभर प्रसारित होत आहे. ‘बीबीसी ऑन ट्रायल (‘बीबीसी’च्या विरुद्ध खटला)’ असे तिचे नाव असून यामध्ये ‘बीबीसी’ करत असलेल्या भारताविरुद्धच्या अपप्रचाराचे अत्यंत अभ्यासपूर्ण चित्रण असेल. ‘ग्लोबल हिंदु फाऊंडेशन’, ‘प्राच्यम्’, ‘स्ट्रिंग जिओ’ आणि ‘जयपूर डायलॉग्ज’ या हिंदुत्वनिष्ठ ऑनलाईन माध्यमांवरून ‘बीबीसी ऑन ट्रायल’ इंग्रजी भाषेत प्रदर्शित केली जाईल. लवकरच हिंदी, तमिळ, मराठी आदी भारतीय भाषांमध्येही तिची भाषांतर केलेली आवृत्ती प्रसारित होईल.
कट्टर भारतद्वेष !
जागतिक स्तरावर भारताच्या विरुद्ध जो ‘डीप स्टेट’ कार्यरत आहे, त्यात बीबीसी एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. भारताच्या, म्हणजेच हिंदूंच्या विरुद्ध ‘बीबीसी’ ही ‘गोबेल्स नीती’चा वापर करून जगाला ‘भारतातील हिंदू हे कसे मुसलमानद्वेष्टे, हिंसाचारी आणि असहिष्णु आहेत’, याचे चित्र सातत्याने रंगवत आली आहे. तसा तर ‘बीबीसी’च्या या एककलमी द्वेषपूर्ण वार्तांकनाला अनेक दशकांचा इतिहास आहे.
वर्ष १९७० मध्ये तिने भारतासंबंधी ‘फँटम इंडिया’ आणि ‘कॅलकटा’ या नावाच्या दोन ‘डॉक्युमेंट्रीज’ प्रसारित केल्या होत्या. त्यांमध्ये भारतातील दारिद्र्य आणि देशाचे निराशावादी चित्र रंगवण्यात आले. भारताला स्वातंत्र्य मिळून २५ वर्षे झाली होती. भारत पुष्कळ पुढे आला होता, तरीही त्याचे कथित विकृत आणि पूर्वग्रहदूषित रूप दाखवण्याचा प्रयत्न ‘बीबीसी’ने चालवला. ‘बीबीसी’ची काश्मीरविषयी भारतविरोधी भूमिका तर सर्वश्रुतच आहे, ज्यात पाकिस्तान आणि जिहादी आतंकवादी यांची बाजू घेऊन अत्यंत पक्षपातीपणे वार्तांकन केले जाते. वर्ष १९९५ मध्ये जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरमधील ‘चरार-ए-शरीफ’ला लक्ष्य करून त्याला जाळले होते. ‘बीबीसी’ने मात्र त्याचे वृत्त दाखवतांना चेचनियामध्ये रशियाचे रणगाडे कारवाई करत असल्याचे व्हिडिओ प्रदर्शित केले. यातून आतंकवादी नाही, तर भारताच्या सैन्याने ‘चरार-ए-शरीफ’वर आक्रमण केल्याचे भासवण्यात आले.
‘बीबीसी’च्या खोटारडेपणाचा अनुमान लावण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे. पत्रकार आणि लेखिका अशाली वर्मा सांगतात, ‘मी एकदा काही कामानिमित्त भारतातील ‘बीबीसी’च्या पत्रकारांच्या कक्षात गेले होते. तिथे उपस्थित पत्रकार हे समूह हत्या, बलात्कार अथवा हिंसाचार यांच्याशी संबंधित घटना शोधण्यात गुंग होते.’ १४० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात अशा नकारात्मक घटना शोधण्यात मग्न असलेल्या या जागतिक वृत्तवाहिनीची वैचारिक पत कळण्यासाठी हे उदाहरण ! वर्ष २००२ मध्ये गोध्रा हत्याकांडाकडे कानाडोळा करून त्यानंतर उसळलेल्या दंगलीचा बागुलबुवा आणि तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरील चिखलफेक असो अथवा वर्ष २०१२ मध्ये देहलीतील निर्भया बलात्कार अन् हत्याकांड यांवरून संपूर्ण देश एकवटला असतांना बलात्कार्याचे उदात्तीकरण, तसेच ‘देहली ही जगाची बलात्काराची राजधानी’ अशा प्रकारे हिणवणारी हीच ती ‘बीबीसी’ ! भारतद्वेषाने पछाडलेल्या ‘बीबीसी’चे सत्य स्वरूप या ‘डॉक्युमेंट्री’तून जगासमोर आणले जाईल.
‘बीबीसी’साठी हिंदु गोरक्षक हे ‘गुंड’, तर मुसलमान गोहत्यारे हे ‘पीडित’ असतात; ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट मुसलमानद्वेष्टा, तर ‘पीके’ चित्रपट हा हिंदु अंधश्रद्धेच्या विरोधातील लढा असतो; १० कोटी झाडे तोडून साजरा करण्यात येणारा ख्रिस्त्यांचा नाताळ हा ‘बीबीसी’साठी आनंदोत्सव, तर हिंदूंचा गणेशोत्सव हा पर्यावरणविरोधी असतो ?
‘बीबीसी’चे ‘बीबीसी ग्लोबल डिसइन्फॉर्मेशन टीम’ आणि ‘बीबीसी व्हेरिफाय’ हे २ विभाग हिंदुद्वेष पुढे रेटण्यासाठी हिंदुविरोधी घटनांना ‘त्या हिंदुविरोधी नसून मुसलमानद्वेषातून घडलेल्या आहेत’, असे चित्र रंगवण्यात मग्न असतात. या विभागांनी बांगलादेशात ऑगस्ट २०२४ मध्ये मुसलमानांनी केलेली शेकडो हिंदुविरोधी आक्रमणे ही ‘हिंदुत्वनिष्ठांकडून केली गेल्याचा अपप्रचार होता’, असे चित्र रंगवले, तर गेल्या वर्षी हरियाणातील नूंह येथे हिंदूंच्या ब्रजमंडल यात्रेवर मुसलमानांकडून आक्रमण झालेले असतांना ‘हिंदु जमावाने मुसलमानांवरच आक्रमण केले’, असे वार्तांकन केले. बहुतांश हिंदु समाज हा अशा आंतरराष्ट्रीय कथानकांच्या कुटील पद्धतींपासून अनभिज्ञ असल्याने तो अशा विषाला फसतो. ‘बीबीसी’च्या दाव्यानुसार प्रत्येक आठवड्याला केवळ भारतात किमान ८ कोटी लोक तिच्या बातम्या वाचतात. यातून ‘बीबीसी’चा पगडा किती आहे, हे लक्षात येते.
हद्दपार करा !
आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी ‘अल्-जझीरा’ने युद्धाचे वार्तांकन करतांना हमासची बाजू उचलून धरल्याने बाणेदार इस्रायलने तिच्या तेथील कार्यालयात घुसून ते बंद पाडले. सध्याचे युद्ध हे शस्त्रास्त्रांपेक्षा विचारांनी खेळले जात असतांना भारतालाही इस्रायलसारखी भूमिका भविष्यात घ्यावी लागणार आहे. ‘बीबीसी ऑन ट्रायल’ हे त्या दिशेने पहिले स्वागतार्ह पाऊल आहे.
‘ग्लोबल हिंदु फाऊंडेशन’चे अध्यक्ष पंडित सतीश शर्मा यांनी यासाठी गेले दीड वर्ष अथक परिश्रम घेऊन त्याची निर्मिती केली आहे. सतीश शर्मा सांगतात, ‘ते गेली ८ वर्षे लंडनच्या ‘बीबीसी’च्या कार्यालयात जाऊन भारतविरोधी वृत्तांकनाच्या विरुद्ध आवाज उठवत आले; परंतु ‘बीबीसी’ने कधीच त्यांना जुमानले नाही. त्यामुळेच मी ‘बीबीसी ऑन ट्रायल’ची निर्मिती केली.’ तिचा प्रचार-प्रसार सर्वदूर होऊन ‘बीबीसी’ला भारतातून हद्दपार करणार्या जनचळवळीची ही ‘डॉक्युमेंट्री’ निर्णायक ठिणगी बनावी, ही अपेक्षा !
‘बीबीसी’च्या विरोधातील लढा ही काळाची आवश्यकता असून त्यात सहभागी होणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्यच ! |
हे ही वाचा – Documentary On Hindu-Hater BBC : जागतिक स्तरावर हिंदुद्वेषाचा चेहरा बनलेल्या ‘बीबीसी’ची चिरफाड करणारी ‘डॉक्युमेंट्री’ प्रदर्शित होणार ! |