परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्थूल देहात न अडकता त्यांच्या शिकवणीनुसार साधना करणारे कारवार (कर्नाटक) येथील श्री. सागर कुर्डेकर (वय ६५ वर्षे) !
१. परात्पर गुरु डॉक्टरांना २३ वर्षांनी भेटणार्या कुर्डेकरकाकांनी ‘तुम्ही सूक्ष्मातून २४ घंटे माझ्यासमवेत आहात’, असे जाणवत असल्याने प्रत्यक्ष भेटीस आलो नाही’, असे गुरुदेवांना सांगणे
‘एकदा मी कारवार (कर्नाटक) येथे एका कामानिमित्त गेलो होतो. तेथे माझी श्री. सागर कुर्डेकर (वय ६५ वर्षे) या साधकांशी भेट झाली. ते मला म्हणाले, ‘‘२३ वर्षांपूर्वी माझी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी पहिली भेट झाली होती. त्यानंतर मी त्यांना कधी भेटलो नव्हतो. आता काही मासांपूर्वी माझी परात्पर गुरु डॉक्टरांशी पुन्हा भेट झाली. तेव्हा परात्पर गुरु मला म्हणाले, ‘‘तुम्ही २३ वर्षांत एकदाही मला भेटण्यासाठी का आला नाहीत ?’’ मी त्यांना म्हणालो, ‘‘तुम्ही सूक्ष्मातून २४ घंटे माझ्यासमवेतच आहात’, असे मला जाणवते. त्यामुळे मी तुम्हाला भेटण्यास आलो नाही.’’ परात्पर गुरु डॉक्टरांना हे उत्तर आवडले.’’
२. परात्पर गुरु डॉक्टरांची ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’ ही शिकवण कृतीत आणणार्या कुर्डेकरकाकांचा ‘गुरूंप्रतीचा भाव उच्च कोटीचा आहे’, हे लक्षात येणे
या प्रसंगी माझ्या मनात विचार आले, ‘सनातन संस्थेच्या स्थापनेपासूनच परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ !’ ही शिकवण दिली आहे. ही शिकवण कुर्डेकरकाकांनी प्रत्यक्ष कृतीत आणली आणि गुरूंना सूक्ष्मातून अनुभवत निरंतर साधना केली. आताच्या घोर कलियुगात गुरूंना प्रत्यक्ष न भेटताही साधनेत २३ वर्षे सातत्य ठेवणे, हे किती कठीण आहे ! असे असूनही काकांनी ते साध्य करून दाखवले आहे. यावरून ‘काकांची परात्पर गुरु डॉक्टरांप्रती श्रद्धा आणि भाव किती उच्च कोटीचा आहे’, हे लक्षात येते.
३. काकांच्या सहवासात नामजप चांगला होणे
काकांशी झालेल्या भेटीत मला ‘ते अंतर्मुख असून नम्र आहेत’, असे जाणवले. त्यांच्या सहवासात माझा नामजप चांगल्या प्रकारे होऊ लागला आणि माझ्या मनाला ईश्वरी आनंद जाणवला.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|