(म्हणे) ‘सलमानने कधी झुरळही मारले नाही !’ – सलीम खान

बिष्णोई आणि सलमान खान

मुंबई – सलमानने कधी झुरळही मारले नाही, तर तो काळवीट तर दूरचा विषय राहिला, असे त्याचे वडील आणि दिग्दर्शक सलीम खान यांनी म्हटले आहे. सध्या बिष्णोई गटाकडून सलमान याला वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर हे भाष्य महत्त्वाचे ठरते.

बिष्णोई समाजासाठी काळवीट हा श्रद्धेचा विषय आहे. गेली अनेक वर्षे काळवीट मारल्याप्रकरणी सलमानवर खटला चालू आहे. त्याला या प्रकरणी ५ वर्षांची शिक्षाही झाली होती. काही काळ तो कारागृहातही होता. २ ऑक्टोबर वर्ष १९९८ मध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी राजस्थानातील जोधपूरमध्ये सलमान खान हा सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू, दुष्यंत सिंह, दिनेश गावरे या कलाकारांसमवेत जिप्सी गाडीतून कांकणी गावातील जंगलात गेला होता. त्या वेळी त्याने काळविटाची शिकार केली. या घटनेचे ४ प्रत्यक्षदर्शीही होते. तिथे रात्री गाडीच्या आवाजाने एक ग्रामस्थ पूनमचंद उठले. गोळ्यांचे आवाज गावकर्‍यांनी ऐकले त्यांनी एकमेकांना उठवले. त्यानंतर हे कलाकार तिथून पळून गेले. छोगाराम बिश्नोई यांनी ही साक्ष न्यायालयात दिली होती. या वेळी त्यांनी म्हटले होते की, एका मुलीने ‘सलमान गोळी मार’, असेही म्हटले होते. या महत्त्वाच्या साक्षीमुळे सलमानला शिक्षा झाली होती. प्रत्यक्षात सुनावणीच्या वेळी   छोगाराम यांनी काही आठवत नसल्याचे सांगून साक्ष फिरवली होती.