सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे मराठी आणि कोकणी भाषांत मिळतील ! – सरन्यायाधीश चंद्रचूड

सरन्यायाधीश चंद्रचूड

पणजी, १९ ऑक्टोबर (वार्ता.) – देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वोच्च न्यायालयातील ३७ सहस्र खटल्यांवरील निवाड्यांचे हिंदीमध्ये भाषांतर झाले आहे. येणार्‍या काळात मराठी आणि कोकणी, तसेच देशातील अन्य भाषांमध्ये या निवाड्यांचे भाषांतर करण्यात येईल, असे उद्गार सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी काढले. गोव्याचे राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी लिहिलेल्या ‘ट्रेडिशनल ट्रीज ऑफ इंडिया’ (भारतातील प्राचीन वृक्ष) या पुस्तकाचे लोकार्पण राजभवनच्या दरबार सभागृहात झाले. या वेळी ते बोलत होते. या पुस्तकाचे प्रकाशन सरन्यायाधिशांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या वेळी सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, ‘‘न्यायालयाने दिलेले निवाडे मराठी, कोकणी, तमिळ इत्यादी विविध राज्यांतील स्थानिक भाषांमध्ये भाषांतरित केल्याने लोकांना हे निवाडे समजणे सोपे होईल आणि न्यायालये कशी कामे करतात ? याविषयी त्यांना माहिती मिळेल. यासाठीच सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत ३७ सहस्र निवाड्यांचे हिंदी भाषेत भाषांत केले आहे.’’ राज्यपाल पिल्लई म्हणाले, ‘‘न्यायव्यवस्थेत स्थानिक भाषांचा समावेश असावा. याचा लोकांना मोठा लाभ होईल. माझ्या ‘ट्रेडिशनल ट्रीज ऑफ इंडिया’ या पुस्तकात देशातील विविध प्रकारची झाडे, निसर्गातील त्यांचे महत्त्व, झाडांचा उपयोग यांविषयी माहिती देण्यात आली आहे.’’

या वेळी डॉ. चंद्रचूड यांनी पुस्तक सिद्ध करण्यात पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी केलेल्या प्रयत्नांचे आणि साहित्याच्या क्षेत्रातील त्यांच्या कार्याचे कौतुक केले. त्याचप्रमाणे त्यांनी सर्वसाधारण लोकांच्या सेवेसाठी राजभवन येथे चालू केलेल्या उपक्रमांची प्रशंसा केली. राज्यपाल श्रीधरन् पिल्लई यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये निसर्गाचे महत्त्व विशद करण्यात आले आहे. झाडांचा मानवाशी आणि निसर्गाशी परस्पर संबंध आहे. या पुस्तकात त्यांनी विविध पारंपरिक झाडांविषयी माहिती देऊन मानवी संस्कृती आणि पृथ्वीमाता यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकला आहे.