आचारसंहितेच्या नावाखाली भगवा ध्वज काढणे, ही धार्मिक अधिकारावर गदा ठरेल ! – हिंदु जनजागृती समिती

नंदुरबार येथे निवेदन !

उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

नंदुरबार – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नंदुरबार निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हरीश भामरे यांच्याकडे निवेदनाद्वारे ‘आचारसंहितेच्या नावाखाली हिंदूंच्या घरावरील किंवा खासगी जागेवरील भगवे ध्वज काढू नयेत’, अशी मागणी करण्यात आली. घरावर भगवा ध्वज लावणे, हा कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार समजला जाऊ शकत नाही. तसे समजून जर तो ध्वज काढण्याची कृती केली गेली, तर ते हिंदूंच्या धार्मिक आचरणावर गदा आणल्यासारखे होईल. हिंदु समाजाने नेहमी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे दायित्व पार पाडत प्रशासनाला साहाय्य केले आहे. तरी सामान्य हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावनांचा आदर करणे, हे प्रशासनाचे कर्तव्य आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतांना धर्मप्रेमी सर्वश्री जितेंद्र मराठे, आकाश गावित, जयेश भोई, मयुर चौधरी, मनीष ठाकूर उपस्थित होते.

निवेदनातील अन्य सूत्रे

१. भगवा ध्वज हा कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसून तो हिंदु धर्माचे प्रतीक आहे.

२. भगवा ध्वज हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आणि अवघ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या ‘हिंदवी स्वराज्या’चा ध्वज आहे.

३. ‘निवडणुकीची आचारसंहिता’ ही निवडणूक लढवणारे उमेदवार, राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते यांना लागू होते. ती सर्वसामान्य व्यक्तीच्या धर्माचरणावर निर्बंध आणू शकत नाही.

४. सामान्य नागरिकांनी त्यांच्या खासगी मालमत्तेवर कोणता ध्वज लावावा, कोणती धार्मिक प्रतीके लावावीत, हा प्रत्येकाचा अधिकार आहे.