Bank Locker White Ants : बँकेतील लॉकरमध्ये ठेवलेल्या २ लाख रुपयांच्या नोटांना वाळवी लागली !
नोएडा (उत्तरप्रदेश) येथील घटना
नोएडा (उत्तरप्रदेश) – येथील सेक्टर-५१ येथील ‘सिटिझन कोऑपरेटिव्ह बँके’तील एका लॉकरमध्ये एका खातेदाराने ५ लाख रुपयांच्या नोटा ठेवल्या होत्या. ३ महिन्यांनंतर संबंधित ग्राहकाने लॉकर उघडले असता त्यातील २ लाख रुपयांच्या नोटांना वाळवी लागली असल्याचे त्या ग्राहकाच्या निदर्शनास आले. यासह उर्वरित ३ लाख रुपयांच्या नोटांनाही वाळवी लागल्याने त्या वापरण्यायोग्य नसल्याच्या स्थितीत असल्याचे त्याला आढळले. यामुळे खातेदाराने बँकेकडे २ लाख रुपये परत मागितले, तसेच३ लाखांच्या नोटा पालटून मागितल्या,परंतु बँक व्यवस्थापनाने पैसे देण्यास नकार दिला. बँकेने म्हटले की, ‘नियमानुसार लॉकरमध्ये पैसे ठेवायचे नसतात. पैसे ठेवण्यासाठी बँकेचे खाते आहे.’ यावर खातेदाराने बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रार केली आहे.
१. एका लॉकरला वाळवी लागली असल्याचे समोर आल्यानंतर बँक व्यवस्थापक आलोक कुमार यांनी सर्व लॉकरधारकांशी संपर्क साधून त्यांना लॉकर तपासण्याची विनंती केली.
२. खातेदारांनी बँकेच्या व्यवस्थापनाविषयी प्रश्न उपस्थित करत म्हटले की, बँक आमच्याकडून वार्षिक १२ सहस्र रुपये ‘लॉकर फी’ घेते. अशा परिस्थितीत लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तू सुरक्षित ठेवण्याचे दायित्व बँकेच्या व्यवस्थापनाचे आहे. वर्षातून किमान दोनदा कीटकनाशक औषधाची फवारणी केली पाहिजे.
३. बँकेच्या व्यवस्थापकांनी बँकेच्या भिंतीमध्ये ओलसरपणा असल्याचे मान्य केले.
लॉकरमध्ये नोटा ठेवणे, हे रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन !
बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापक इंदू जयस्वाल म्हणाल्या की, लॉकर हे ग्राहकांच्या सोयीसाठी आहे. यामध्ये केवळ महत्त्वाची कागदपत्रे, मालमत्तेची कागदपत्रे, मौल्यवान दागिने आणि इतर वस्तू ठेवता येतात; परंतु पैसे ठेवता येत नाहीत. लॉकरमध्ये नोटा ठेवणे, हे रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आहे. जर एखाद्या व्यक्तीने लॉकरमध्ये पैसे ठेवले, तर तिला हे सिद्ध करावे लागेल की, ती त्याची वैध रक्कम आहे.