St. Wilfred Convent School, Panvel : शुल्क न भरणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यापासून रोखले !

पनवेल येथील सेंट विल्फ्रेड कॉन्व्हेंट शाळेचा मनमानी कारभार !

विरोध प्रदर्शन करताना पालक

पनवेल – शेडुंग येथील सेंट विल्फ्रेड शाळेमध्ये शुल्क न भरल्याने शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यापासून रोखल्याचे वृत्त सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून सर्वत्र पसरले. या प्रकरणी पालकांनी शाळेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. ‘शुल्क न भरणार्‍या विद्यार्थ्यांच्या संदर्भात केला जाणारा हा प्रकार, म्हणजे त्यांचे मानसिक खच्चीकरणच करणे होय. पैसे वसूल करण्यासाठी परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांचा असा प्रकारे छळ केला जाण्याला ही काय भूमाफियांची शाळा आहे का ? शाळेमध्ये करण्यात येणारा भ्रष्टाचार म्हणजे पालकांकडून केली जाणारी लूटच आहे’, असा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. ‘शाळेच्या मुख्याध्यापकांविरोधात गुन्हा नोंदवायला हवा. विद्यार्थ्यांच्या संदर्भात टोकाची भूमिका घेणार्‍या शाळेच्या प्रशासनावर पोलिसांनी त्वरित कारवाई करावी’, अशी मागणी पालकांनी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विशेष कोणत्याही सुविधा नाहीत, तसेच पाण्याचीही टंचाई असल्याचे समजते.

संपादकीय भूमिका

पोलिसांनी याविषयीची सखोल चौकशी करून सत्य जनतसमोर आणले पाहिजे !