Hawala Funding By PFI : पी.एफ्.आय.कडून भारतात आतंकवादी कारवायांसाठी हवालाद्वारे निधी ! – ईडी

पी.एफ्.आय.चे सिंगापूर आणि आखाती देशांमध्ये १३ सहस्रांहून अधिक सदस्य

नवी देहली – भारताने बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या आतंकवादी संघटनेच्या सदस्यांकडून भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी हवालाद्वारे निधी पाठवला जात असल्याची माहिती अंमलबजावणी संचलनायलयाने (‘ईडी’ने) दिली. पी.एफ्.आय.चे सिंगापूर आणि आखाती देशांमध्ये १३ सहस्रांहून अधिक सदस्य असून त्यांच्याकडे हा निधी जमवण्याचे दायित्व होते.
सप्टेंबर २०२२ मध्ये राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) आणि ईडी यांनी पी.एफ्.आय. देशभरातील ठिकाणांवर छापे घातले. यामध्ये पी.एफ्.आय.शी संबंधित अनेक नेत्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर यू.ए.पी.ए. कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. छापेमारीनंतर केंद्र सरकारने २८ सप्टेंबर २०२२ या दिवशी पी.एफ्.आय. वर बंदी घातली. तेव्हापासून ईडी पी.एफ्.आय.चे सखोल अन्वेषण करत आहे. वरील माहिती हा याच अन्वेषणाचा भाग आहे.

जिहादच्या माध्यमातून भारतात इस्लामी चळवळ निर्माण करणे, हेच पी.एफ्.आय.चे खरे उद्दिष्ट !

पी.एफ्.आय.चे खरे उद्दिष्ट तिच्या घटनेत नमूद केलेल्या उद्दिष्टांपेक्षा वेगळे असल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे. पी.एफ्.आय. स्वतःला सामाजिक संघटना म्हणून भासवते; परंतु पी.एफ्.आय.चे खरे उद्दिष्ट जिहादच्या माध्यमातून भारतात इस्लामी चळवळ निर्माण करणे, हे असल्याचे अन्वेषणात समोर आले आहे. (भारतात कुणी ‘हिंदु राष्ट्रा’विषयी बोलले, तर लगेचच काँग्रेसवाले, पुरोगामी, साम्यवादी वगैरे लोक मुसलमानांना धोका असल्याची आवई उठवतात. असे लोक आता पी.एफ्.आय.च्या या कृत्याविषयी गप्प का ? – संपादक) पी.एफ्.आय.चा दावा होता की, ती तिचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शांततापूर्ण आणि अहिंसक मार्गाचे अवलंब करील; परंतु अन्वेषणात असे दिसून आले की, शारीरिक प्रशिक्षण वर्गांच्या नावाखाली, पी.एफ्.आय. ठोसे, लाथा, चाकूद्वारे आक्रमण करणे, लाठीद्वारे आक्रमण करणे, यांसारख्या हिंसक कृतींचा सराव करत आहे.

पी.एफ्.आय.चे एकही ठिकाण तिच्या नावावर नाही !

देशात सध्या असलेल्या पी.एफ्.आय.च्या ठिकाणांपैकी एकही ठिकाण या संघटनेच्या नावावर नोंदणीकृत नाही. (पी.एफ्.आय.ची हुशारी जाणा ! – संपादक) शारीरिक प्रशिक्षण वर्गाची जागाही डमी मालकांच्या नावावर नोंदवण्यात आली होती. वर्ष २०१३ मध्ये केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील शारीरिक प्रशिक्षण वर्गात स्फोटक आणि हिंसक शस्त्रांस्त्रांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. विविध धर्मांमधील वैर वाढवणे आणि पी.एफ्.आय.च्या सदस्यांना आतंकवादी कारवायांसाठी उद्युक्त करणे, हा या शिबिराचा उद्देश होता.

संपादकीय भूमिका

  • भारतात आतंकवादी कारवायांसाठी विदेशातून पैसा पाठवला जातो यावरून विदेशी शक्ती भारताला अस्थिर आणि अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे स्पष्ट होते. या शक्ती कोण आहेत ?, हे भारताने अन्वेषण करून जनतेसमोर उघड केले पाहिजे !
  • हा निधी कुणाकुणाला मिळाला, त्यांची नावे उघड करून त्यांनाही आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !