Chhatrapati Shivaji Maharaj Centre In JNU : देहलीतील जे.एन्.यू.मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने केंद्र चालू होणार !

गनिमी युद्ध धोरण आणि शासन कौशल्य, यांवर संशोधन होणार !

‘जे.एन्.यू.’च्या कुलगुरू प्रा. शांतीश्री धुलीपुडी पंडित

नवी देहली – येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात अर्थात् (‘जे.एन्.यू.’त) पुढील वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ हे केंद्र चालू करण्यात येणार आहे. भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये आदर्श पालट घडवून आणणे, हा या केंद्राचा उद्देश आहे. हे केंद्र ‘जे.एन्.यू.’तील ‘सेंटर ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’ अंतर्गत कार्यरत असेल.

या उपक्रमासाठी महाराष्ट्र सरकारने १० कोटी रुपयांचे अनुदानही दिले आहे. ‘जे.एन्.यू.’चे कुलगुरू प्रा. शांतीश्री धुलीपुडी पंडित म्हणाल्या, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे नौदल, युद्धनीती आणि हिंदवी स्वराज्याची संकल्पना, या विषयांचा आत्तापर्यंत नीट अभ्यास झालेला नाही. त्यामुळेच हे विषय शिकवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.’’

केंद्राची रचना आणि अभ्यासक्रम !

या केंद्रामध्ये एकूण १४ पदे असतील. यांमध्ये १ प्राध्यापक, २ सहयोगी प्राध्यापक आणि ४ साहायक प्राध्यापक यांचा समावेश असेल. यासह अन्यही पदांवर नेमणुका होणार आहेत. याखेरीज या केंद्रात ‘आयटी इन्फ्रास्ट्रक्चर लॅब’, वाचनालय, अभ्यासिका आदींसारख्या सुविधाही उपलब्ध असतील. या केंद्राच्या अभ्यासक्रमात ‘मराठा ग्रँड स्ट्रॅटेजी’, ‘गुरिल्ला डिप्लोमसी’, ‘स्ट्रॅटेजिक प्रोचेस टू असिमेट्रिक वॉरफेअर’, आदी विषयांचा समावेश असेल. विद्यार्थ्यांना या विषयांवर संशोधन करण्याची संधी दिली जाणार आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी ‘ईस्ट एशियन स्टडीज सेंटर’चे प्रा. अरविंद वेल्लारी आणि ‘युरोपीयन स्टडीज’ सेंटरचे डॉ. जगन्नाथन् यांच्यासारख्या तज्ज्ञांचे साहाय्य घेतले जाणार आहे. यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीचे दर्शन घडवणारे अत्याधुनिक संग्रहालयही उभारण्यात येणार आहे.