NK Troops Fighting For Russia : युक्रेनविरुद्धच्या युद्धात उत्तर कोरियाचे १२ सहस्र सैनिक रशियाच्या साहाय्यासाठी पोचले !

  • दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेचा दावा

  • तिसरा देश युद्धात सहभागी झाल्यास महायुद्धात रूपांतर होण्याची झेलेंस्की यांची चेतावणी

उत्तर कोरियाचे सैन्य (डावीकडे) उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन व रशियाचे राष्ट्रपती पुतीन (उजवीकडे) युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की (मध्यभागी)

सेऊल (दक्षिण कोरिया) – उत्तर कोरियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला साहाय्य करण्यासाठी त्याचे १२ सहस्र सैनिक पाठवले आहेत. यामध्ये विशेष मोहिमांसाठीच्या सैन्याच्या शक्तीशाली तुकडीचा समावेश असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थांनी दिली. यावर युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की म्हणाले की, जर तिसरा देश युद्धात सहभागी झाला, तर या संघर्षाचे महायुद्धात रूपांतर होऊ शकते.

‘नाटो’चे (‘नाटो’ म्हणजे ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ नावाची जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक सैनिकी संघटना) महासचिव मार्क रटे म्हणाले की, उत्तर कोरियाचे सैन्य युद्धात सहभागी झाल्याचा आमच्याकडे कोणताही पुरावा नाही; मात्र उत्तर कोरिया रशियाला शस्त्रास्त्रांचा पुरवठा, तसेच युद्धात पाठिंबा देण्यासाठी तांत्रिक पुरवठा, अशा अनेक मार्गांनी साहाय्य करत आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे.