लॉरेन्स बिश्नोई गटाकडून सलमान खानला पुन्हा धमकी !
मुंबई – ‘हिट अँड रन’ आणि काळवीट शिकार प्रकरणी आरोप झालेला चित्रपट अभिनेता सलमान खान याला लॉरेन्स बिश्नोई गटाने पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी दिली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर हा लघुसंदेश आला आहे.
‘हा मेसेज हलक्यात घेऊ नका. जर सलमान खानला जिवंत रहायचे असेल, आणि लॉरेन्स बिश्नोई गँगशी असणारे वैर त्याला संपवायचे असेल, तर त्याला ५ कोटी रुपयांची रक्कम द्यावी लागेल. जर पैसे मिळाले नाहीत, तर बाबा सिद्दिकी यांच्यापेक्षा त्याची वाईट अवस्था होईल’, असे यात म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर सलमान खानच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला अशा प्रकारे धमकावले जात आहे. वर्ष १९९८ मध्ये सलमान खान याने २ काळविटांची शिकार केली होती. बिश्नोई समाजात काळविटांना पवित्र मानले जाते.