चीनमधील साम्यवादी राजवटीची पंच्याहत्तरी !
१ ऑक्टोबर २०२४ या दिवशी चीनमधील साम्यवादी राजवटीने ७५ वर्षे पूर्ण केली. वर्ष १९४९ ते २०२४ असा चीनच्या प्रगतीचा आलेख हा कमालीचा थक्क करणारा आहे. गेल्या ७५ वर्षांमध्ये एखादे राष्ट्र इतकी प्रचंड आर्थिक प्रगती करते, हे उदाहरण अत्यंत उल्लेखनीय आहे. कोरोना महामारीनंतर चीनची जागतिक विश्वासार्हता न्यून झाली असली आणि आर्थिक विकासाचा वेगही मंदावला असला, तरी आजही चीन अमेरिकेला मागे टाकून पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहे अन् तशा सिद्धतेत आहे. चीनला हे यश सहज मिळालेले नाही. यासाठी चीनला प्रचंड कष्ट घ्यावे लागले आहेत. दीर्घकाळ वसाहतवादी गुलामगिरीत काढलेल्या एका गरीब आणि मागास देशाने आज जगातील दुसर्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनण्यापर्यंतची मजल गाठली आहे. आज अमेरिकेला सर्वांत मोठी भीती चीनची आहे. भविष्यात अमेरिका आणि चीन यांच्यातील एका नव्या शीतयुद्धाची शक्यता अभ्यासक वर्तवत आहेत. चीन-अमेरिका संघर्ष भविष्यातील जागतिक राजकारणाची दिशा ठरवणार आहे. याप्रसंगी चीनचा हा संघर्षाचा आणि आर्थिक प्रगतीचा ७५ वर्षांचा इतिहास समजून घेणे सयुक्तिक ठरणार आहे.
लेखक : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे.
१. चीनची सांस्कृतिक क्रांती आणि ‘आर्थिक महासत्ता’ बनण्याचा संकल्प
१ ऑक्टोबर १९४९ या दिवशी चीनमध्ये माओ त्से तुंग यांच्या नेतृत्वाखाली साम्यवादी राजवट प्रस्थापित झाली. माओने शिआन कै शिंगच्या राष्ट्रवादी फौजांशी संघर्ष करत ‘लाँग मार्च’च्या (महामोर्चाच्या) माध्यमातून चीनमध्ये साम्यवादी राजवट प्रस्थापित केली. चीनच्या पुनर्बांधणीमध्ये अनेक नेत्यांचे मोठे योगदान आहे. त्यामध्ये सर्वांत महत्त्वाचे योगदान साम्यवादी चीनचे संस्थापक माओ त्से तुंग यांचेही आहे. त्यांच्या सांस्कृतिक क्रांतीने चीनच्या आजच्या सामर्थ्याचा पाया रचला. माओची सांस्कृतिक क्रांती ही खर्या अर्थाने चीनला एक नवे रूप देणारी होती. माओने घातलेल्या पायावर कळस चढवला तो डेंग शियाओपेंग यांनी ! त्यांनी १९८० च्या दशकामध्ये आधुनिक चीनच्या अर्थव्यवस्थेचा पाया घातला. साम्यवादी राजवट असतांनाही आर्थिक उदारीकरणाचा मार्ग स्वीकारला. या माध्यमातून चीनची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेला जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच काळात चीनने आर्थिक विकासासाठी पंचवार्षिक योजना आखायला प्रारंभ केला. डेंग शियाओपेंग यांनी चीनच्या आर्थिक विकासाचा पाया घातल्यानंतर २१ व्या शतकात त्याची फळे चीनला मिळाली. आज चीन उत्पादनाच्या क्षेत्रात सर्वांत अग्रेसर आहे. ‘जीडीपी’तील (सकल देशांतर्गत उत्पन्नातील) या क्षेत्राचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक आहे. चीन साम्यवादी झाला, तेव्हा आता राष्ट्राध्यक्ष असणारे शी जिनपिंग जन्मलेलेही नव्हते; पण त्यांना चीनच्या या संघर्षाच्या इतिहासाची पूर्ण जाणीव आहे; म्हणूनच त्यांनी पुन्हा एकदा माओ त्से तुंग यांच्याप्रमाणे साम्यवादी पक्षाची पकड पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
चीनमध्ये व्यक्तीकेंद्रीत सत्ताकारण चालू झाले आहे. वर्ष २०१५ मध्ये साम्यवादी पक्षाच्या महत्त्वपूर्ण परिषदेत शी जिनपिंग यांना २०२९ पर्यंत ‘राष्ट्राध्यक्षपदी’ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. या १० वर्षांत ‘आर्थिक महासत्ता’ बनण्याचा संकल्प चीनने सोडला आहे. त्या अंतर्गतच ‘वन बेल्ट वन रोड’ (आशिया, आफ्रिका आणि युरोप यांना चीनला जोडण्यासाठीचा प्रकल्प), ‘मॅरिटाईम सिल्क रूट’ (हिंदी महासागरातील व्यापारी मार्ग) यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आल्या आहेत. चीनचा प्रवास जागतिक महासत्तेच्या दिशेने होत आहे. ज्या वेळी साम्यवादी चीनच्या स्थापनेची ७० वर्षे झाली, तेव्हा १ ऑक्टोबर २०१९ या दिवशी शी जिनपिंग यांनी स्वतःच्या लष्करी शक्तीचे प्रदर्शन जगाला घडवून आणले होते. त्यासाठी बीजिंगच्या चौकामध्ये मोठे लष्करी संचलन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी राष्ट्राला संबोधून केलेल्या भाषणात शी जिनपिंग यांनी भविष्यात चीन कशा पद्धतीने विकास करणार आहे, याचा आलेख मांडला; पण त्यानंतर आलेल्या कोरोना महामारीने आणि या महामारीच्या निर्मितीच्या संशयाची सुई चीनकडे वळल्याने त्याच्या आर्थिक विकासाच्या योजना अडथळ्यांनी भरल्या.
२. माओ कालखंड आणि सांस्कृतिक क्रांती
१६ मे १९६६ या दिवशी या क्रांतीचा प्रारंभ चीनमध्ये झाला होता. या सांस्कृतिक क्रांतीला चीनमधील तत्कालीन नेते माओ त्से तुंग यांच्या कारकीर्दीमधील शेवटची क्रांती (लास्ट बॅटल ऑफ माओ), असेही म्हटले जाते. वर्ष १९७६ मध्ये माओ त्से तुंग यांचा मृत्यू झाला, तोपर्यंत ही सांस्कृतिक क्रांती चालू राहिली. माओंनी ‘वर्ष १९६९ मध्ये ही क्रांती संपली’, असे अधिकृतरित्या घोषित केलेले असले, तरी ती क्रांती जवळपास चीनचे एक दशक या क्रांतीमध्ये व्यतित झाले. सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे या क्रांतीचा प्रभाव ५० वर्षांनंतरही आज चीनवर दिसून येत आहे.
२ अ. सांस्कृतिक क्रांती का चालू झाली ? : ही सांस्कृतिक क्रांती, म्हणजे माओ त्से तुंग यांनी चालू केलेली शुद्धीकरणाची प्रक्रिया होती. ही प्रक्रिया प्रामुख्याने भांडवलवादी प्रभावापासून चीनला शुद्ध करण्याच्या हेतूने केली होती. किंबहुना ‘चीनमध्ये साम्यवादाचा न्यून होत गेलेला प्रभाव पुन्हा एकदा मजबूत करणे’, हा यामागे हेतू होता. चीनचे राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण यांमध्ये असणार्या काही भांडवलवादी प्रवृत्तींनी त्या काळात तोंड वर काढायला प्रारंभ केला होता. या प्रवृत्तींच्या विरोधामध्ये ही सांस्कृतिक क्रांती चालू झाली होती. ‘भांडवलवादी प्रवृत्तींचा पूर्णपणे बीमोड करणे, भांडवलवादाच्या प्रभावातून चीनला मुक्त करणे आणि संपूर्ण चीनमध्ये साम्यवादाचा पगडा मजबूत करणे’, हा या सांस्कृतिक क्रांतीमागचा उद्देश होता. या १० वर्षे चाललेल्या क्रांतीने संपूर्ण चीनला ढवळून काढले. यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थी, नंतर कामगार आणि सैन्य यांना आळीपाळीने वापरण्यात आले. ज्या ज्या ठिकाणी भांडवलवादी तत्त्वे आढळली, तेथे तेथे त्यांचा अतिशय हिंसक पद्धतीने बीमोड करण्यात आला. लाखो लोकांना तुरुंगात डांबण्यात आले. सहस्रो लोकांना मारण्यात आले. एकंदरीतच अत्यंत क्रूर आणि हिंसक पद्धतीने ही शुद्धीकरणाची चळवळ चीनमध्ये राबवली गेली. साम्यवादाची पकड मजबूत करण्यासह चीनवरील परकीय किंवा भांडवलवादाचा प्रभाव चीनमध्ये येऊ नये, यासाठी नियोजनबद्ध आखणी करून केलेले हे कृत्य होते.
२ आ. चीन काय शिकला ? : आज ५० वर्षांनंतर या सांस्कृतिक क्रांतीमधून चीन काय शिकला आहे ? या क्रांतीच्या वेळी असणारा चीन आजही तसाच आहे का ? या क्रांतीमधून माओने जी मूल्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता, ती मूल्ये आजही टिकून आहेत का ? आणि आजचा चीन हा सांस्कृतिक क्रांतीचेच अपत्य आहे का ? तीच तत्त्वे किंवा मूल्ये आज चीन जोपासतो आहे का ? या प्रश्नांची उत्तरे शोधणे औचित्याचे ठरेल. यासंदर्भात इतिहासकारांची मते पाहिली, तर त्यामध्ये बरीच मतभिन्नता आढळते. काही इतिहासकार या सांस्कृतिक क्रांतीचे दशक, म्हणजे चीनच्या आर्थिक विकासाच्या, राजकीय-सामाजिक वाटचालीतील अतिशय वाईट काळ मानतात.
‘आजही चीनमध्ये अधिकृतरित्या सांस्कृतिक क्रांतीवर चर्चा किंवा वादविवाद केले जात नाहीत. तेथील जनतेला तसे करण्याची अनुमती नाही. अशा प्रकारची चर्चा चालू केल्यास चीनमधील माओच्या परंपरेला खीळ बसेल आणि चीनमधील साम्यवादी पक्षाची एकपक्षीय राजवट कमकुवत होईल’, अशी मानसिकता तेथे आहे. त्यामुळेच लोकांना उघडपणे या विषयावर बोलण्याची अनुमती नाही. प्रसारमाध्यमांनाही अनुमती नाही. आज चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या पन्नाशीची चर्चाही तेथे पाश्चिमात्य माध्यमांमधून होते आहे, हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातूनच या क्रांतीचा प्रभाव पडताळून पहाणे आवश्यक आहे. या सांस्कृतिक क्रांतीचा पहिला परिणाम, म्हणजे ‘या क्रांतीने डेंग शियाओपेंग यांच्या नेतृत्वाच्या उदयाला पोषक अशा प्रकारची पार्श्वभूमी सिद्ध केली.’
३. डेंग कालखंड म्हणजे आर्थिक उदारीकरणाचे वारे !
वर्ष १९७६ मध्ये माओंचा मृत्यू झाल्यानंतर डेंग शियाओपेंग यांच्या हाती सत्तेची सूत्रे आली. वास्तविक डेंग हे या सांस्कृतिक क्रांतीत फसलेले नेते होते. या क्रांतीच्या काळात त्यांच्यावर मोठा अन्याय झाला होता; परंतु याच डेंग यांनी या सांस्कृतिक क्रांतीच्या नकारात्मक प्रभावातून चीनला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच काळात साम्यवादाकडून भांडवलवादाच्या दिशेने चीनचा प्रवास चालू झाला. बंदिस्त अर्थव्यवस्थेकडून खुल्या अर्थव्यवस्थेकडे चीन वळला. डेंग यांच्या काळातच चीनमध्ये आर्थिक उदारीकरणाचे आणि काही प्रमाणात खासगीकरणाचे वारे वाहू लागले. याच डेंग शियाओपेंग यांनी चीनच्या विकासाचा २० वर्षांचा आराखडा आखला आणि या आराखड्यामध्ये शियाओपेंग यांनी पाश्चिमात्य अर्थतज्ञांनी मांडलेल्या विकासाच्या नव्या तत्त्वांनुरूप चीनच्या अर्थव्यवस्थेचा विकास करण्याचा प्रयत्न केला. भांडवलवादी तत्त्वांवर चीनचा कशा पद्धतीने विकास करता येईल, हे डेंग यांनी दाखवून दिले. त्यातूनच संपूर्ण चीनची अर्थव्यवस्था कृषीप्रधानतेकडून उद्योगप्रधानतेकडे परावर्तित झाली.
आज चीनचे पश्चिमी जगताशी आणि अमेरिकेशी असणारे व्यापारी संबंध हे पुष्कळ व्यापक बनलेले आहेत. अमेरिकेशी चीनचा असणारा व्यापार अनुमाने ७०० अब्ज डॉलर्स (५७ लाख कोटी रुपयांहून अधिक) इतका आहे. पाश्चिमात्य देशांनी चीनमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे. चीननेही या देशांमध्ये प्रचंड गुंतवणूक केलेली आहे. चीनमधील अनेक नागरिक आज परदेशांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे माओच्या काळातील चीन आज उरलेला नाही. आज चीन हा भांडवलवादाकडे झुकलेला दिसत आहे. आज चिनी नागरिक हा व्यक्तीगत अधिकारांविषयी सजग बनलेला दिसत आहे, जो माओच्या सांस्कृतिक क्रांतीच्या काळामध्ये नव्हता. आज चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये जो प्रचंड पालट घडलेला दिसत आहे, त्याला ही सांस्कृतिक क्रांती कारणीभूत ठरली आहे; कारण या क्रांतीच्या काळात चीनमध्ये औद्येागिक उत्पादन कमालीचे घटले होते. चीनचा व्यापार घटला होता. गरिबी प्रचंड वाढली होती. त्यामुळे चीनने जी भांडवलवादी आर्थिक विकासाची तत्त्वे स्वीकारली, त्याची पार्श्वभूमी या क्रांतीने सिद्ध केली होती. आर्थिकदृष्ट्या चीन पूर्णपणे पालटलेला असला, तरी राजकीयदृष्ट्या विचार करता माओंच्या सांस्कृतिक काळातील चीन आजही तसाच दिसून येतो. (१४.१०.२०२४)
(क्रमशः)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/846615.html