विनयभंग प्रकरणातील आरोपीला २ दिवसांत जामीन मिळतो कसा ?
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ठाणे पोलिसांना प्रश्न
ठाणे, १८ ऑक्टोबर (वार्ता.) – ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी आरोपीला अटक केली; परंतु अवघ्या २ दिवसांत आरोपीला जामीन मिळाला. या घटनेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘विनयभंग करणार्या आरोपीला २ दिवसांत जामीन मिळतो कसा ?’, असा प्रश्न उपस्थित केला. पीडित मुलीचा जबाब नोंदवून आरोपीला पुन्हा अटक करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना केल्या आहेत.
आरोपीविरोधात कठोर कारवाई होण्यासाठी मनसे आणि ठाकरे गटाने ठाणे येथे मोर्चा काढला होता. या मोर्चात नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे येथे आले असता त्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.