यंदाही जगाच्या पाठीवर युद्धजन्य परिस्थिती !- नगर येथील बिरोबा देवस्थान येथील भाकित
निमगाव वाघा (ता. अहिल्यानगर) – येथील प्रसिद्ध बिरोबा देवस्थान येथे १७ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या होईकात (भविष्यवाणी) १० खंडांत चळवळ होऊन दिनमान काळा होणार असल्याचे म्हणजेच सर्वच क्षेत्रांत चळवळी होऊन अस्थिरता निर्माण होणार असल्याचे भाकित वर्तवण्यात आले आहे, तर खंडात रक्ताचा पूर वहाणार म्हणजेच युद्धजन्य परिस्थिती रहाणार, तसेच काही ठिकाणी पाऊस पडेल आणि काही ठिकाणी पडणार नाही, असे सांगण्यात आले. भाकितात पुढे सांगितले आहे की, दिवाळीचे दिपान (काळात) अडीच ते पाच दिवस सर्वत्र आभाळ येऊन पाऊस पडेल. सध्याच्या पिकांना रोगराई असणार आहे. सोन्याचे भाव उच्चांकी गाठेल, तर कापूस, गहू, हरभरा यांचे मनभाव रहाणार.
मागील वर्षीचे भाकित खरे ठरले !
मागील वर्षीचे युद्धजन्य परिस्थितीचे भाकित आणि अत्यंत कठीण काळाचे भाकित खरे ठरले आहे. देवाचे भगत नामदेव भुसारे यांनी हे होईक सांगितले आहे. होईकच्या या धार्मिक कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.