स्पर्शाच्या माध्यमातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी चैतन्य दिल्याविषयी साधिकेला आलेली अनुभूती !
१. शिबिर संपवून रामनाथी आश्रमातून निघत असतांना आश्रमाला आणि श्री सिद्धिविनायक अन् श्री भवानीदेवी यांना प्रार्थना करणे
‘२.७.२०२४ ते ११.७.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधकांसाठी ‘साधनावृद्धी’ शिबिर आयोजित केले होते. हे शिबिर संपवून रात्री रामनाथी आश्रमातून बेंगळुरू येथे जातांना मी आश्रमाला आणि आश्रम परिसरात असलेल्या श्री सिद्धिविनायक अन् श्री भवानीदेवी यांच्या मूर्तींना नमस्कार केला आणि ‘तुमच्याच कृपेने आम्ही साधनेचे ध्येय पूर्ण करू शकतो. आम्हा सर्वांना आशीर्वाद द्या’, अशी प्रार्थना केली.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना साधनेसाठी शक्ती देण्याविषयी प्रार्थना होणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर साधकांसाठी सत्संग घेत होत्या. तेव्हा मी त्यांच्या दिशेने तोंड करून त्यांना नमस्कार केला आणि प्रार्थना केली, ‘हे महालक्ष्मी, तुम्हीच आम्हा सर्वांना एका वर्षाच्या साधनेसाठी दिलेले व्यष्टी अन् समष्टी साधनेचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती शक्ती आणि चैतन्य द्या.’
३. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी बसमध्ये चढून साधिकेच्या हाताला स्पर्श केल्यावर तिचे मन विचारशून्य होणे
त्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो. इतक्यात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर आम्हाला निरोप द्यायला बसजवळ आल्या. त्यांनी बसमध्ये चढून सर्वांना नमस्कार केला, तसेच त्यांच्या चैतन्यदायी हातांनी सर्वांच्या हातांना स्पर्श केला. त्यानंतर बसमध्ये पूर्ण शांतता जाणवत होती. त्या वेळी माझे मन विचारशून्य झाले.
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी ‘आम्ही सर्वांनी परिश्रम घेऊन साधना करावी’, यासाठी आम्हाला प्रेरणा दिली. बस निघत असतांना त्यांनी आम्हाला निरोप दिला. त्यामुळे बसमधील सर्व साधकांना पुष्कळ आनंद झाला.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी स्पर्श केलेल्या उजव्या हातामध्ये पुष्कळ चैतन्य जाणवणे
नंतर बसमध्ये त्यांच्या स्मरणाने माझी पुष्कळ भावजागृती होत होती. ‘गुरुदेव आमच्या उद्धारासाठी किती करतात !’, याविषयी मला कृतज्ञता वाटली. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी माझ्या उजव्या हाताला स्पर्श केला होता. मी डोळे मिटून माझ्या दोन्ही हातांचा तुलनात्मक अभ्यास केला. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘त्यांनी स्पर्श केलेल्या उजव्या हातात पुष्कळ चैतन्य जाणवत होते. तसे चैतन्य मला माझ्या डाव्या हातात जाणवत नव्हते. ही अनुभूती मला पुष्कळ वेळ येत होती. ‘श्री गुरूंनी त्या दोघींच्या माध्यमातून स्पर्श करून आम्हाला चैतन्याचा स्रोतच दिला आहे’, असे मला वाटले आणि पुष्कळ कृतज्ञता वाटली.
ही अनुभूती दिल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. रेवती मोगेर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ३३ वर्षे), बेंगळुरू, कर्नाटक. (१३.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |