‘भावपूर्ण प्रार्थना केल्यावर देव सेवेत साहाय्य करतो’, यासंदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करतो. काही वेळा सेवा करतांना मला अनेक अडचणी येतात. तेव्हा मला ‘मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भावपूर्ण प्रार्थना करतो आणि ते माझ्याकडून त्यांना अपेक्षित अशी सेवा करून घेतात’, अशी अनुभूती येते. मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. ताप आलेला असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर सेवा करता येणे
वर्ष २०२४ मध्ये झालेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला आलेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा मेक्अप (चेहर्याचे सौंदर्यवर्धन) करण्याची, म्हणजे ‘चित्रीकरणाच्या दृष्टीने केस नीट करणे, कपाळाला टिळा लावणे’ इत्यादी सेवा माझ्याकडे होत्या. महोत्सवाचे पहिले ३ दिवस मी सेवा केली. त्यानंतर पहाटे अकस्मात् मला ताप आला. तेव्हा मला पुष्कळ अशक्तपणा जाणवला आणि ‘आता मी सेवा करू शकणार नाही’, असे मला वाटले. तेव्हा मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केली, ‘आता मला फार ताप आला आहे आणि मी शक्तीहीन झालो आहे. मला महोत्सवाच्या ठिकाणी मेक्अपची सेवा करायची आहे आणि ही सेवा करणारा दुसरा साधक नाही. ‘या हिंदुत्वाच्या कार्यामध्ये माझ्या त्रासांमुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये’, यासाठी तुम्ही मला शक्ती द्या आणि तुम्हीच मला या सेवेसाठी घेऊन जा.’ त्यानंतर अंगात ताप असतांनाही मी अंघोळ केली. मी कार्यक्रमस्थळी वेळेवर पोचलो. मी तेथे सेवा करत असतांना माझ्या अंगातील ताप उतरायचा आणि सेवा संपल्यावर मला पुन्हा ताप यायचा. अशा प्रकारे ३ दिवस परात्पर गुरुदेवांच्या कृपेने मला सेवा करता आली. महोत्सव संपल्यावर मला ताप आला नाही किंवा थकवाही जाणवला नाही. ही अनुभूती मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘भावपूर्ण प्रार्थना केल्यावर देव साहाय्य करतो’, याचेच हे एक उदाहरण आहे.’’
२. कमरेत तीव्र वेदना होत असतांना प्रार्थना केल्यावर संतांच्या हस्तरेषांचे ठसे घेण्याची सेवा करता येणे
आध्यात्मिक संशोधनाच्या दृष्टीने सनातनचे संत आणि सद्गुरु यांच्या हाताला शाई लावून कोर्या कागदावर हस्तरेषांचे ठसे घेण्याची सेवा माझ्याकडे आहे. १२.७.२०२४ या दिवशी मला ही सेवा करायची होती. त्यासाठी एकच दिवस संत आणि सद्गुरु उपलब्ध असणार होते; पण नेमके त्याच दिवशी माझ्या कमरेत असह्य वेदना होऊ लागल्या. तेव्हा मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘गुरुमाऊली, आज मला संत आणि सद्गुरु यांच्या हस्तरेषांचे ठसे घ्यायचे आहेत. मला ही सेवा आजच पूर्ण करायची आहे. तुम्ही मला सेवा करण्यासाठी शक्ती द्या आणि सेवा पूर्ण करून घ्या.’ त्यानंतर मी कंबर दुखत असतांना हळूहळू सेवा चालू केली. नंतर माझी कंबर दुखण्याची जाणीव न्यून होऊ लागली. त्यानंतर ‘माझ्या कमरेत वेदना होत आहेत’, हे मी विसरून गेलो आणि ‘सेवा कधी पूर्ण झाली ?’, हे मला कळले नाही. हे केवळ परात्पर गुरुदेवांच्या कृपेनेच शक्य झाले.
३. प्रार्थना केल्यावर साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना त्यांच्या साधनेसाठी जे आवश्यक आहे, ते सांगता येणे आणि साधकांनी साधनेचे प्रयत्न उत्साहाने करणे
रामनाथी आश्रमातील काही साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याची सेवा माझ्याकडे आहे. आढावा घेतांना ‘साधकांकडून साधनेचे प्रयत्न व्हायला हवेत. ‘मी काय करू, म्हणजे ते उत्साहाने प्रयत्न करू शकतील ?’, असे विचार माझ्या मनात येत होते. तेव्हा मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करायला आरंभ केला, ‘गुरुदेव, तुम्हीच या सर्व साधकांकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न करून घ्या. त्यांच्यामध्ये व्यष्टी साधनेची तळमळ निर्माण करा. त्यांची जलद आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी जे अपेक्षित आहे, ते तुम्हीच माझ्या वाणीतून त्यांना सांगा. या सेवेचे कर्ता-करविता तुम्हीच आहात. ही सेवा तुम्हीच माझ्याकडून करून घ्या.’ त्यानंतर माझ्या मनातील ‘साधकांनी प्रयत्न करायला हवेत’, हा विचार पूर्णपणे निघून गेला. साधकांना त्यांच्या साधनेसाठी जे आवश्यक आहे, ते माझ्याकडून सांगितले जाऊ लागले आणि साधकांचे प्रयत्न हळूहळू चालू झाले. पूर्वी काही साधकांकडून काहीच प्रयत्न होत नव्हते. त्या साधकांनीही उत्साहाने प्रयत्न चालू केले.
वरील अनुभूती दिल्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |