उत्साही, सेवेची तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले मंगळुरू येथील सनातनचे २३ वे संत पू. विनायक कर्वे (वय ८२ वर्षे) !

‘सनातनचे २३ वे संत पू. विनायक रघुनाथ कर्वे (पू. कर्वेमामा) यांचा उद्या आश्विन कृष्‍ण चतुर्थी (२०.१०.२०२४) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पू. विनायक कर्वे यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. साधी रहाणी आणि निरपेक्ष वृत्ती

श्रीमती अश्विनी प्रभु

पू. कर्वेमामा यांची जीवनशैली अत्यंत साधी आहे. ते स्वतः दुचाकी गाडी चालवतात आणि स्वत:ची वैयक्तिक सेवा अन् कामे करतात. ते नेहमी भूमीवर बसूनच जेवण करतात. ‘स्वतःला भोजनात वेगवेगळे पदार्थ करून द्यावेत’, अशी त्यांची कधीच अपेक्षा नसते. ते नेहमी आनंदाने प्रसाद आणि महाप्रसाद ग्रहण करतात.

२. प्रवासामुळे थकवा न येणे

पू. मामा कधी कधी त्यांच्या गावी कारवार (कर्नाटक) येथे जातात. मंगळुरू येथून त्यांच्या गावी जाण्यासाठी ५ – ६ घंटे प्रवास करावा लागतो. एवढा प्रवास करूनही त्यांना थकवा जाणवत नाही.

३. सेवेची तळमळ

पू. मामा कुंकवाच्या डब्यांचे ‘पॅकिंग’ करण्याची सेवा करतात, तसेच साधकांसाठी नामजपादी उपायही करतात. ते नेहमी उत्साहाने सेवा करतात आणि सेवेत मग्न असतात. अलीकडे त्यांना सतत खोकला यायचा, तरीही त्यांनी सेवा करणे थांबवले नाही.

४. साधकांचे शंकानिरसन करणे

पू. मामा मितभाषी आहेत; परंतु त्यांना साधनेच्या संबंधित काही शंका किंवा प्रश्न विचारले की, त्यांच्या प्रचंड ज्ञानसागराचे दर्शन होते. ते मनाचे श्लोक आणि भगवद् गीतेतील श्लोक यांचा भावार्थ समजावून सांगतात.

५. सतत नामजप करणे

पू. मामांचे मन सतत नामजपात मग्न असते. क्वचितच त्यांच्या हातात जपमाळ नसते.

६. चैतन्यामुळे साधकांचा उत्साह वाढणे

पू. मामांच्या चैतन्यामुळे त्यांच्या परिसरात नेहमी सकारात्मक वातावरण असते. त्यामुळे साधकांचा सेवेतील उत्साह वाढतो आणि पू. मामांच्या अस्तित्वाने सर्वांमध्ये आत्मीयतेचा भाव निर्माण होतो.

७. भक्तीसत्संगांची आवड

गुरुवारी दुपारी २.३० वाजता होणारे भक्तीसत्संग पू. मामा नियमित ऐकतात. दुपारी विश्रांती न घेता ते हे सत्संग ऐकतात.

८. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती भाव

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या स्मरणाने पू. मामांचा भाव जागृत होतो. पू. रमानंद गौडा प.पू. गुरुदेवांविषयी काही प्रसंग किंवा अनुभूती सांगतात. त्या वेळी पू. मामा अगदी वेगळ्याच स्थितीत असतात.

पू. मामांसारख्या संतांचा सत्संग मिळवून देणार्‍या सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी अनन्य कृतज्ञताभावाने प्रार्थना करते. ‘आम्हा साधकांमध्येही पू. मामांसारखा साधनेचा उत्साह अन् ओढ निर्माण होवो’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना करते.’

– श्रीमती अश्विनी प्रभु (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५८ वर्षे), मंगळुरू, कर्नाटक. (३०.९.२०२४)