Adulterated Potatoes : रासायनिक रंग दिलेले बनावट बटाटे खाल्‍ल्‍याने होऊ शकतो कर्करोग !

बलिया (उत्तरप्रदेश) येथे २१ क्‍विंटल बनावट बटाटे जप्‍त

नवी देहली – अन्‍न सुरक्षा आणि औषध प्रशासनाच्‍या पथकाने उत्तरप्रदेशाच्‍या बलिया येथे २१ क्‍विंटल बनावट बटाटे जप्‍त केले आहेत. सर्वत्र आणि त्‍यातही उत्तर भारतात बटाट्यांचा आहारात पुष्‍कळ वापर होत असल्‍याने बटाट्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्‍या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी व्‍यापारी बटाटे पटकन परिपक्‍व होण्‍यासाठी रसायनाने रंग देतात. अशा बटाट्यांचे सेवन केल्‍याने कर्करोगही होऊ शकतो.

रासायनिक रंगांच्‍या वापराचे शरिरावर हे होतात दुष्‍परिणाम !

१. मनुष्‍याच्‍या शरिरातील पेशींची हानी होते.

२. फळे आणि भाज्‍या लवकर परिपक्‍व होण्‍यासाठी ‘कॅल्‍शियम कार्बाइड’चा वापर केला जातो. या रसायनाला ‘सिटिलीन वायू’ किंवा मसाला असेही म्‍हणतात. कॅल्‍शियम कार्बाइडमध्‍ये आर्सेनिक आणि फॉस्‍फरस असते. यामुळे उलट्या, जुलाब, संडासावाटे रक्‍त पडणे, छातीत जळजळ, पोटात जळजळ, अधिक तहान लागणे किंवा अशक्‍तपणा होऊ शकतो, अशी माहिती भारतीय अन्‍न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने दिली आहे.

३. जागतिक आरोग्‍य संघटनेचे म्‍हणणे आहे की, कॅल्‍शियम कार्बाइडच्‍या दीर्घकालीन संपर्कामुळे मूत्राशय आणि फुफ्‍फुस यांचा कर्करोग होण्‍याचा धोका सर्वाधिक असतो.

४. ‘इंटरनॅशनल एजन्‍सी फॉर रिसर्च ऑन कॅन्‍सर’च्‍या मते, पिण्‍याच्‍या पाण्‍यात आर्सेनिक असले, तरी ते कर्करोगास कारणीभूत ठरू शकते.

बनावट बटाटे कसे ओळखाल ?


बटाट्याच्‍या पृष्‍ठभागावर काळे डाग किंवा असामान्‍य रंग असल्‍यास ते रसायनांचा वापर करून परिपक्‍व केले असू शकतात. कॅल्‍शियम कार्बाइडमुळे असे डाग तयार होतात. हिरवा रंग किंवा वास देणारे बटाटेही खरेदी करू नयेत. तसेच बटाटे खरेदी करतांना ते चोळून बघा. जर त्‍यातून एखादा रंग तयार झाला, तर रसायने वापरून बटाटे पिकवले आहे, हे लक्षात घ्‍या. तसेच बटाटे एका भांड्यात काही वेळ पाण्‍यात सोडा. जर त्‍याला रंग आला, तर समजा की, रसायन वापरून बटाटे पिकवले आहेत.