US On Pannun Murder Attempt Case : (म्हणे) ‘भारताच्या ‘रॉ’च्या अधिकार्‍याने अमेरिकेत पन्नू याच्या हत्येचा कट रचला !’ – अमेरिकेचा न्याय विभाग

अमेरिकेच्या न्याय विभागाचा आरोप

(‘रॉ’ म्हणजे भारताची ‘रिसर्च अँड अ‍ॅनालिसीस विंग’, ही गुप्तचर संस्था )

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू

न्यूयॉर्क (अमेरिका) – खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा एफ्.बी.आय. (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन)ने न्यूयॉर्कच्या न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले आहे. यात भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’च्या विकास यादव या माजी अधिकार्‍यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवला आहे. यादव यांनी भारताच्या कॅबिनेट सचिवालयात काम केले, ज्यात भारताची परदेशी गुप्तचर सेवा, संशोधन आणि विश्‍लेषण विंग (रॉ) आहे. त्याच्यावर हत्येचा कट आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. अजून तो पसार आहे. त्याचा सहकारी निखिल गुप्ता याला गेल्या वर्षी युरोपमधील चेकोस्लोव्हाकिया देशामध्ये अटक करण्यात आली होती आणि प्रत्यार्पणानंतर तो अमेरिकेच्या कारागृहात आहे. भारताने यापूर्वी अमेरिकेचे या संदर्भातील आरोप फेटाळलेले आहेत.

१. एफ्.बी.आय.ने आरोपपत्रात म्हटले आहे की, विकासने निखिल गुप्ता याला या कटात सहभागी करून घेतले आणि सूचना दिल्या, ज्यात त्याच्याकडे पन्नूविषयी संपूर्ण माहिती होती. यामध्ये पन्नूचा पत्ता, भ्रमणभाष क्रमांक आणि दैनंदिन कामकाजाचा समावेश होता.

त्यानंतरच गुप्ता याने पन्नूची हत्या करण्यासाठी एका गुन्हेगाराशी संपर्क साधला, ज्याला तो सुपारी घेऊन हत्या करणारा मानत होता. तथापि तो प्रत्यक्षात अमेरिकेच्या ‘ड्रग एन्फोर्समेंट डमिनिस्ट्रेशन’ विभागाचा गुप्त हस्तक होता. या हत्येसाठी यादवने १ लाख डॉलर (अनुमाने ८३ लाख रुपये) देण्याची योजना आखली होती.

१. अमेरिकेचे अ‍ॅटर्नी जनरल मेरिक बी. गारलँड म्हणाले की, न्याय विभाग अमेरिकी लोकांना लक्ष्य करण्याचा, धोक्यात आणण्याचा आणि प्रत्येक अमेरिकी नागरिकाच्या अधिकारांना न्यून करण्याचा प्रयत्न सहन करणार नाही.

२. ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’चे संचालक क्रिस्टोफर रे यांनी सांगितले की, आरोपी भारत सरकारचा कर्मचारी आहे. त्याने एका गुन्हेगारी सहकार्‍यासमवेत कट रचला असून अमेरिकी भूमीवर एका अमेरिकी नागरिकाची हत्या करण्याचा प्रयत्न केला.

३. अमेरिकेने केलेल्या आरोपानंतर भारताने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली होती. यावर अमेरिकेने समाधानही व्यक्त केले होते.

विकास यादव याचा निज्जरच्या हत्येत संबंध असल्याचा कॅनडाचा आरोप अमेरिकेनेच फेटाळला

पन्नूच्या हत्येच्या कटात भारताचे नाव समोर आल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी दावा केला होता की, ‘निज्जरच्या हत्येत विकास यादव याचाही हात होता’; मात्र अमेरिकेने तो फेटाळला आहे. ‘विकासाचा कॅनडातील निज्जर हत्याकांडाशी संबंध नाही’, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे म्हणणे आहे.

संपादकीय भूमिका

कोणताही पुरावा नसतांना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी आतंकवादी निज्जर याच्या हत्येचा आरोप केल्यानंतर आता त्यांनी पुरावे नसतांना आरोप केल्याची निलाजरी स्वीकृती दिली. तसेच अमेरिकेचेही होणार आहे. अमेरिकालाही हे सांगावे लागणार आहे !