Pandit Vasantrao Gadgil : पुण्यातील ज्येष्ठ ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व आणि संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक पंडित वसंतराव गाडगीळ अनंतात विलीन !

‘शारदा ज्ञानपीठा’चे संस्थापक, ज्येष्ठ ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व आणि संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक पंडित वसंतराव गाडगीळ

पुणे : येथील ‘शारदा ज्ञानपीठा’चे संस्थापक, ज्येष्ठ ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व आणि संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक पंडित वसंतराव गाडगीळ (वय ९५ वर्षे) यांचे १८ ऑक्टोबर या दिवशी सकाळी अनंतात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी धार्मिक क्षेत्रातील अनेक महनीय मान्यवर उपस्थित होते.

हिंदु धर्म, संस्कृती आणि संस्कृत भाषा यांविषयी त्यांनी एका तपस्व्याप्रमाणे कार्य केले. संस्कृत भाषेविषयी त्यांनी मौलिक संशोधने केली आणि त्यांविषयी अनेक ग्रंथ लिहिले. हिंदु धर्म संस्कृतीचे शिलेदार असणार्‍या या व्यक्तीमत्त्वाने दिलेले योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा देत राहील.

वर्ष २०१२ मध्ये श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले होते. ‘गाडगीळजी केवळ संस्कृतमध्ये स्वप्न बघत नाहीत, तर ते संस्कृतचेच स्वप्न बघतात’, असे गौरवोद्गार माननीय नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याविषयी काढले होते.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिन सोहळ्यात संस्कृतमधून भाषण करून सर्वांना आश्‍चर्यचकित करणारे पंडित वसंतराव गाडगीळ !

पंडित वसंतराव गाडगीळ

वर्ष २००९ मध्ये पुण्यात दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात पंडित वसंतराव गाडगीळ यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. या सोहळ्यात त्यांनी संस्कृतमधून भाषण करून सर्वांना आश्‍चर्यचकित केले. यावरून त्यांची संस्कृत भाषेविषयीची श्रद्धा आणि तिच्या प्रसाराची तळमळ दिसून आली.

पंडित वसंतराव गाडगीळ यांचे समितीच्या कार्याला अनेक वेळा मार्गदर्शन लाभले ! – सुनील घनवट, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

पंडित वसंतराव गाडगीळ यांचा हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला आधार होता. हिंदु जनजागृती समितीचे ते संस्थापक सदस्य होते. समितीच्या कार्यातही त्यांचे अनेक वेळा मार्गदर्शन लाभले. ‘गणेशोत्सवातील गैरप्रकार रोखा’, असे अभियान असो किंवा सिंधुदुर्ग येथील मंदिर परिषद असो, त्यामध्ये त्यांचा सहभाग, तसेच त्यांचे मार्गदर्शन लाभले. ते शंकराचार्य पिठाचे पुण्यातील प्रतिनिधी आहेत. हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी त्यांना विशेष स्नेह होता. शेवटच्या श्‍वासापर्यंत देव, देश, धर्म आणि राष्ट्र यांसाठी अखंड कृतीशील असणारे असे अद्वितीय व्यक्तीमत्त्व म्हणजे पंडित वसंतराव गाडगीळ होते. त्यांच्या निधनाने ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व हरपले आहे.

पंडित वसंतराव गाडगीळ यांची कार्यओळख

पंडित वसंतराव गाडगीळ

पंडित वसंतराव गाडगीळ प्रत्येक वर्षी पुण्यात ऋषिपंचमी जाहीररित्या साजरी करत. ८० वर्षांवरील तपस्वी, विद्वान, निरनिराळ्या क्षेत्रांत विधायक कार्य करणार्‍या पुण्यातील आणि पुण्याबाहेरील नामवंत व्यक्तींचा सत्कार करत. ते अद्यापपर्यंत स्वागतपर भाषण संस्कृतमध्येच करत. गेली ४४ वर्षे हा उपक्रम खंड न पडता ते आयोजित करत होते. अमेरिका, आफ्रिका येथे जाऊन त्यांनी संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार केला.

वर्ष २०१० मध्ये प्रभाकर जोशी यांनी डॉ. भीमराव आंबेडकर यांची पहिली संस्कृत चरित्रकथा ‘भीमायणम्’ ही वसंतराव गाडगीळ यांच्या ‘शारदा गौरव ग्रंथमाला’ मालिकेअंतर्गत लिहिली. वसंतराव गाडगीळ यांनी विनायक सावरकर यांच्या जीवनकथेसंबंधित जी.बी. पाळसुले यांच्या संस्कृत कवितेचेही प्रकाशन केले.

एक आठवण : दलाई लामांसोबत

संस्कृत अभ्यासक पंडित वसंतराव गाडगीळ हे संस्कृत साहित्य, नाटक, आणि भाषाशास्त्रातील महत्त्वपूर्ण व्यक्तीमत्त्व होते. त्यांना त्यांचे संशोधन कार्य आणि साहित्यिक योगदानासाठी ‘महाकवी कालिदास संस्कृत व्रती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

डॉ. सच्चिदानंद शेवडे

शतक हुकले ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ, लेखक आणि व्याख्याते

घरभर पसरलेली पुस्तके, घरात ठायी ठायी पुस्तकांचे भारे, भिंतींच्या जागी छतापर्यंत दिसणारी पुस्तके अशा प्रकारे आपले संपूर्ण आयुष्य संस्कृत भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी समर्पित करणारे अन् आवर्जून संस्कृतमधूनच भाषण करत सभा गाजवणारे ज्येष्ठ संस्कृततज्ञ, ‘शारदा ज्ञानपीठम्’चे संस्थापक, ज्येष्ठ पत्रकार, हिंदु धर्मशास्त्राचे अभ्यासक, पुणे येथील असंख्य धार्मिक-सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांचे मार्गदर्शक, एक चालतं-बोलतं विद्यापीठ, एका मोठ्या कालखंडाचे साक्षीदार, तो विशाल कालपट आत्मचरित्राद्वारे ‘प्रसाद’ मासिकातून क्रमशः मांडणारे, वेळोवेळी मार्गदर्शक असणारे, शतकाकडे वाटचाल करणारे पं. वसंतराव गाडगीळ !

– डॉ. सच्चिदानंद शेवडे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ, लेखक आणि व्याख्याते