Supreme Court On Isha Foundation Case : उच्च न्यायालयाने स्वतःचे कार्यक्षेत्र ओलांडून आश्रमाच्या झडतीचा आदेश दिला !

सद्गुरु जग्गी वासुदेव यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देत मद्रास उच्च न्यायालयाला फटकारले !

सद्गुरु जग्गी वासुदेव

नवी देहली – सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाऊंडेशन’च्या कोइम्बतूर येथील आश्रमात २ बहिणींना बलपूर्वक डांबून ठेवल्याच्या संदर्भात त्यांच्या वडिलांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. यावरून उच्च न्यायालयाने या आश्रमाची झडती घेण्याचा आदेश पोलिसांना दिला होता. यानंतर १५० पोलिसांनी या आश्रमाची झडती घेतलीही होती. याविरोधात सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाला फटकारत मुलींच्या वडिलांची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, २ महिला स्वच्छेने आश्रमात रहात आहेत, हे त्यांनी स्वतः सांगितल्यानंतरही उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावण्याऐवजी स्वतःचे कार्यक्षेत्र ओलांडून आदेश दिला.

ज्या २ महिलांना बंदी बनवल्याचा आरोप करण्यात आला होता, त्यांच्याशी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दालनात न्यायमूर्तींनी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला. या वेळी दोन्ही महिलांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना सांगितले की, त्या दोघीही स्वच्छेने आश्रमात रहात आहेत.

मद्रास उच्च न्यायालयाने काय म्हटले होते ?

३० सप्टेंबर या दिवशी झालेल्या सुनावणीत मद्रास उच्च न्यायालयाने जग्गी वासुदेव यांच्या अधिवक्त्यांना प्रश्‍न विचारला की, जग्गी वासुदेव यांनी स्वतःच्या मुलीचे लग्न लावून दिलेले असतांना ते इतर तरुणींना संसाराचा त्याग करून करून संन्याशांसारखे जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन का देत आहेत ?

संपादकीय भूमिका

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे तमिळनाडूमधील द्रमुक सरकार आणि पोलीस यांचा हिंदुद्वेष पुन्हा एकदा उघड झाला आहे ! द्रमुक सरकारने कधी देशविघातक कारवायांच्या प्रकरणी मदरसे आणि मशिदी यांची झडती घेण्याचा आदेश दिला आहे का ?