Finally Israel Killed Hamas Chief : हमासचा प्रमुख याह्या सिनवार अखेर ठार !

हमासचा प्रमुख याह्या सिनवार, त्याचा मुतदेह आणि मध्यभागी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

तेल अविव (इस्रायल) – इस्रायलने १ वर्षाच्या युद्धानंतर हमासचा प्रमुख याह्या सिनवार याला ठार मारण्यात यश मिळवले. सिनवार याला ठार मारल्याची माहिती इस्रायलच्या सैन्याने दिली. १७ ऑक्टोबरला इस्रायलने दक्षिण गाझा पट्टीतील रफा शहरात केलेल्या आक्रमणात ३ आतंकवादी ठार झाले. यांतील याह्या सिनवार हा एक होता. त्याचा एक व्हिडिओही इस्रायलच्या सैन्याने प्रसारित केला आहे. ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हमासने इस्रायलवर केलेल्या आक्रमणात याह्या सिनवार याचा हात होता.

युद्ध संपलेले नाही ! – नेतान्याहू

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू म्हणाले की, हमासने शस्त्र खाली ठेवले आणि आमच्या ओलिसांची सुटका केली, तरच गाझा-इस्रायल युद्ध संपुष्टात येईल. हमासने गाझामध्ये २३ देशांतील १०१ लोकांना ओलीस ठेवले आहे. इस्रायल प्रत्येकाला घरी परत आणण्यासाठी वचनबद्ध आहे. इस्रायल सर्व ओलिसांच्या सुरक्षिततेची हमी देतो. आमच्या देशाच्या ओलिसांना दुखापत करणार्‍यांना इस्रायल शोधून शिक्षा करील. नरसल्ला गेला, त्याचा नायब मोहसीन गेला, हानिया गेला, दैफ गेला आणि आता सिनवार गेला. इराणने स्वत:च्या लोकांवर, तसेच इराक, सीरिया, लेबनॉन आणि येमेन यांच्या लोकांवर लादलेले दहशतीचे राज्यही संपेल. ज्यांना मध्य-पूर्वेत समृद्धी आणि शांतता हवी आहे, अशा सर्व लोकांनी चांगले भविष्य घडवण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे.

संपूर्ण जगासाठी चांगला दिवस ! – अमेरिका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

सिनवारला ठार मारल्याच्या घटनेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, सिनवार ७ ऑक्टोबरला इस्रायलवर झालेल्या आक्रमणाचा सूत्रधार होता. सिनवार हा सहस्रो इस्रायली, पॅलेस्टिनी, अमेरिकी आणि ३० हून अधिक देशांतील नागरिकांच्या मृत्यूसाठी तो उत्तरदायी होता. त्यामुळे त्याला ठार मारणे, हा इस्रायल आणि अमेरिकेसह संपूर्ण जगासाठी चांगला दिवस आहे.

प्रतिकाराची भावना अधिक भक्कम होईल ! – इराण

‘हमासचा प्रमुख याह्या सिनवार याच्या मृत्यूमुळे या भागातील ‘प्रतिकार’ अधिक भक्कम होईल’, असे इराणच्या संयुक्त राष्ट्रांतील प्रतिनिधीने ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले. यात पुढे म्हटले की, पॅलेस्टाईनच्या मुक्तीच्या दिशेने सिनवारच्या मार्गाचा अवलंब करणारे तरुण आणि मुले यांसाठी तो आदर्श बनेल. जोपर्यंत व्यवसाय आणि आक्रमकता आहे, तोपर्यंत प्रतिकार चालूच राहील; कारण हुतात्मा ‘जिवंत’ असतो आणि प्रेरणास्रोतही असतो.

‘कसाई’ याह्या सिनवार !

याह्या सिनवार याला अनेक नावांनी ओळखले जाते. याह्या सिनवार इतका क्रूर होता की, त्याने अनेक पॅलेस्टाईनी नागरिकांना तडफडवून मारले आहे. त्यामुळेच त्याला ‘कसाई’ असे संबोधले जात होते. लहान मुलांसमोर त्याने अनेकांच्या हत्या केल्या होत्या. तो लहान मुलांना ‘बंदुक कशी चालवावी ?’, हे शिकवायचा. याह्या सिनवारचे क्रौर्य फारच भयंकर होते. एकदा त्याने इस्रायलसाठी हेरगिरी करण्याच्या संशय असलेल्या एका माणसाला जिवंत पुरले होते. त्यासाठीचा खड्डा त्याने त्या व्यक्तीच्या भावालाच खणायला लावला होता.

संपादकीय भूमिका

जिहादी आतंकवाद कसा नष्ट करायचा ?, हे भारताने इस्रायलकडून शिकावे आणि तशी कृती करावी, असेच भारतियांना वाटते !