हृदय आणि फुप्फुसे यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी ‘कार्डिओ’ व्यायाम करणे आवश्यक आहे !
निरोगी जीवनासाठी व्यायाम – भाग १९
‘शरिरातील पेशींना प्राणवायू (ऑक्सिजन) आणि पोषक द्रव्ये यांचा पुरवठा करण्यासाठी रक्ताभिसरण अन् श्वसनप्रणाली, म्हणजे हृदय, फुप्फुसे आणि रक्तवाहिन्या यांची कार्यक्षमता चांगली असणे महत्त्वाचे आहे. रक्ताभिसरण उत्तम होत असल्यास व्यक्तीची कार्य करण्याची क्षमता सुधारते आणि त्यामुळे ती न थकता दीर्घकाळ शारीरिक श्रम करू शकते. वजनाचे संतुलन राखून उच्च रक्तदाब, हृदयविकार, पक्षाघात (स्ट्रोक) यांसारखे विकार टाळण्यास साहाय्य होते.
हृदय आणि फुफ्फुसे यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी ‘कार्डिओ’ व्यायाम केले जातात. यामध्ये पूर्ण शरिराला गतीमान करणार्या हालचाली करण्याकडे भर असतो, उदा. धावणे, पोहणे, सायकल चालवणे इत्यादी. या हालचालींमध्ये शरिरातील मोठ्या स्नायूंना चालना मिळून हृदय आणि फुप्फुसे अधिक क्षमतेने कार्य करण्यासाठी उद्युक्त होतात. त्यामुळे व्यायाम करतांना आरंभी हृदयाचे ठोके आणि श्वसनाची गती वाढते, तसेच कालांतराने हृदय अन् फुफ्फुसे यांची क्षमता वाढते. या प्रक्रियेचे लाभ पूर्ण शरिरात अनुभवायला मिळतात, उदा. थकवा असल्यास तो न्यून होतो, अनावश्यक चरबी न्यून होते इत्यादी. त्यामुळे हृदय आणि फुप्फुसे यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी अन् व्यायामाचा पूर्ण शरिरावर चांगला परिणाम होण्यासाठी ‘कार्डिओ’ व्यायाम करणे आवश्यक आहे.’
– कु. वैदेही शिंदे, भौतिकोपचार (फिजिओथेरपी) अभ्यासक, फोंडा, गोवा. (३०.९.२०२४)
निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise