रात्रीच्या वेळी होणार्‍या दुचाकी स्पर्धांवर कारवाई कधी ?

मुंबई-गोवा महामार्गावर होते दुचाकींची शर्यत (बाईक रेस) !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई–गोवा महामार्गावर पणजीकडे जाण्याच्या मार्गावर रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांची स्पर्धा होत असल्याचे लक्षात आले. म्हापसा येथील बस्तोडा पूल ते ग्रीन पार्क पूल या मार्गावर नुकतीच रात्री १२.३० ते १ या कालावधीत १० ते १५ युवकांचा एक गट आपापल्या दुचाकी घेऊन उभा असल्याचे दिसले. तेथून थोडे पुढे गेल्यावर असे लक्षात आले की, एकाच वेळी ३ दुचाकीस्वार मोठ्या आवाज करणार्‍या दुचाकी अतीवेगाने पळवत आहेत, तसेच निर्धारित अंतर पूर्ण केल्यावर ते गेलेल्या मार्गावरून परत फिरून विरुद्ध दिशेने येत आहेत. या वेळी ते तिघेही एकमेकांशी स्पर्धा करत असल्याचे लक्षात आले. त्या वेळी रस्त्यावर लहान-मोठ्या चारचाकी, दुचाकी, तसेच अवजड वाहनांची ये-जा सुद्धा चालू होती. त्यांच्या दुचाकी वाहनांची गती आणि चालवण्याची पद्धत हे दोन्ही त्यांच्या स्वत:च्या, तसेच इतरांच्या जिवाला धोका उत्पन्न करणारी होती. एकीकडे रस्त्यांवर होणार्‍या अपघातांविषयी समाज आणि सरकार चिंता व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे वर्दळीच्या महामार्गावर काही युवक दुचाकीवर ‘स्टंट’बाजी (लक्ष वेधून घेणार्‍या कृती) करत आहेत. अशा युवकांवर, तसेच वाहनांवर परिवहन विभाग (आर्.टी.ओ.) आणि वाहतूक नियंत्रक पोलीस कारवाई करतील का ?

श्री. रवींद्र बनसोड

हे युवक इतर वेळीही राज्यात इतरत्र गतीने वाहने पळवत असतात. गोव्यात ठिकठिकाणी रस्त्यांवर ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवलेले आहेत, याची यत्किंचितही पर्वा या अनियंत्रित दुचाकीस्वारांना नाही, असे लक्षात येते. यातील बर्‍याच दुचाकी वाहनांवर वाहन क्रमांकाच्या पाट्यासुद्धा नाहीत. परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी अशी वाहने अन् चालक यांवर तातडीने कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात रस्त्यावर होणारे अपघात रोखता येतील.

– श्री. रवींद्र बनसोड, फोंडा, गोवा.