नाती जपायला हवीत !
बेमेतरा (छत्तीसगड) येथील कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नीलिमा सिंह यांनी न्यायालयाच्या भिंतींवर सप्तपदीच्या ७ वचनांची प्रतिमा लावलेली आहे. घटस्फोट घेण्यासाठी येणार्या दांपत्यांना नीलिमा या ७ वचनांची जाणीव करून देतात. सप्तपदी ही संस्कृतमध्ये असते. विवाह प्रसंगीच्या या वचनांची आठवण बहुतांश लोकांना नसते. म्हणूनच हिंदीत भाषांतर करून त्या त्याची प्रतिमा जोडप्यांना भेट देतात. त्यांनी अनेकांचे संसार ‘लोकअदालत’च्या वेळी उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले. यावरून हिंदु धर्माची महानताही लक्षात येते. हिंदु धर्माने १६ संस्कार सांगितले आहेत. त्यांतील सर्वांत महत्त्वाचा ‘विवाहसंस्कार’ ! विवाहाचा खरा उद्देश, म्हणजे दोन जिवांचे भावी जीवन एकमेकांना पूरक अन् सुखी होण्यासाठी ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करून घेणे. विवाह संस्काराने निर्माण झालेले बंधन अखंड असते आणि ते जन्मोजन्मी टिकते, अशी सर्वसाधारण समजूत आहे.
असे असतांनाही आज पती-पत्नीमधील वाढत्या वादांमुळे स्वतंत्र कुटुंब न्यायालयाची स्थापना करावी लागली आहे. सध्या अशा खटल्यांची संख्या एवढी झाली आहे की, त्वरित न्याय मिळणे अवघड बनले आहे. नागपूर येथील कौटुंबिक न्यायालयातील एक अधिवक्त्या केतकी जलतारे सांगतात, ‘‘सध्या मुलांचा आणि मुलींचा दृष्टीकोन प्रचंड व्यक्तीकेंद्रित झाला आहे. त्यामुळे ‘मीच तडजोड का करू ?’, असा प्रश्न मुलामुलींकडून उपस्थित केला जातो. आधीच्या पिढीमध्ये कितीही त्रास असला, तरी शक्यतो निभावून नेण्याची वृत्ती होती. ‘तोडणे सोपे जोडणे अवघड’, याची जाण होती. आता प्रत्येक जण स्वावलंबी आहे. त्यामुळे ते पटकन निर्णय घेऊन मोकळे होतात. कुटुंब, नाती यांपेक्षा स्वावलंबनाला किंवा नवीन आयुष्य चालू करायला अधिक प्राधान्य दिले जाते. प्राचीन वेदादी ग्रंथांत घटस्फोटांचा उल्लेख सापडत नाही. घटस्फोट म्हणजे पती-पत्नीचे निर्माण झालेले वैध वैवाहिक संबंध कायदेशीररित्या तोडणे. ‘घटस्फोट हा मृत्यूपेक्षाही अधिक वेदनादायक असू शकतो’, असे अभिनेते नितीश भारद्वाज यांनी म्हटले आहे. प्रसिद्ध गायिका श्रीमती आशा भोसले यांनी नुकतेच एक विधान केले, ‘‘सध्याची जोडपी प्रत्येक महिन्याला घटस्फोटाचे कागद सिद्ध करतात. युवा पिढी विवाहाला पुष्कळ सहजतेने घेते. समस्या सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न त्यांच्याकडून होत नाहीत. मी तर रात्रंदिवस कामात व्यस्त असूनही ३ मुलांचा सांभाळ केला.’’ नात्यांमधील संवाद, प्रेम, संयम, सहनशीलता हे अल्प झाल्याने घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती वाढणे आवश्यक आहे. कुटुंबातील सर्वांनी साधना आणि धर्माचरण केल्यास इतरांशी जुळवून घेणे, इतरांना क्षमा करणे, प्रेमभाव जोपासणे आदी सर्व सोपे जाईल. इतरांविषयीच्या अपेक्षा न्यून होतील अन् संसाररूपी गाडा सुरळीत चालू शकेल !
– श्री. नीलेश पाटील, जळगाव