शिरस्त्राण परिधान न केलेल्या दुचाकीचालकाची अनुज्ञप्ती रहित करणार ! – गोवा पोलीस

पणजी, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – शिरस्त्राण परिधान न करता दुचाकी चालवणार्‍यांच्या विरोधात गोवा पोलिसांनी व्यापक मोहीम आरंभली आहे. या अंतर्गत शिरस्त्राण परिधान न करता दुचाकी चालवणार्‍या १०० जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शिरस्त्राण परिधान न केलेल्या दुचाकीचालकाची अनुज्ञप्ती रहित करण्यात येणार असल्याची चेतावणी पोलिसांनी दिली आहे. राज्यात १३ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबवली जात आहे.

राज्यभर १ सहस्र शिरस्त्राण विनामूल्य वितरित करणार ! – वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो

वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो

वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी १६ ऑक्टोबर या दिवशी त्यांच्या दाबोळी मतदारसंघात चिखली जंक्शन येथे शिरस्त्राण परिधान न केलेल्या दुचाकीचालकांना हेरून त्यांना विनामूल्य शिरस्त्राण वितरित केले. या वेळी वाहतूकमंत्री गुदिन्हो म्हणाले, ‘‘काही जणांना सुरक्षेविषयी जाणीव असते; मात्र शिरस्त्राण खरेदी करणे त्यांना परवडत नाही. त्यामुळे अशांना विनामूल्य शिरस्त्राण वितरित केले जात आहे. अशा प्रकारे दाबोळी मतदारसंघात १००, तर सर्व राज्यभर १ सहस्र शिरस्त्राण विनामूल्य वितरित केले जाणार आहे. शिरस्त्राण परिधान करण्याचे महत्त्व लोकांना समजावे, यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.’’