संपादकीय : विनाशकारी संघर्ष : वास्तव आणि भवितव्य !
वर्ष २०२४ चा शांततेचा ‘नोबेल’ पुरस्कार जपानमधील ‘निहोन हिडानक्यो’ या संघटनेला नुकताच मिळाला आहे. ‘नॉर्वेजियन नोबेल समिती’ने या पुरस्काराची घोषणा केली. या संघटनेने आण्विक शस्त्रांच्या विरोधात दीर्घकाळ मोहीम चालवल्याने तिला हा पुरस्कार देण्यात आला. ही संघटना जगाला आण्विक शस्त्रांपासून मुक्त करण्यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे. या संघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे यामधील लोक म्हणजे दुसरे-तिसरे कुणी नसून दुसर्या महायुद्धाच्या वेळी वर्ष १९४५ मध्ये हिरोशिमा आणि नागासाकी येथे झालेल्या अणूबाँबच्या आक्रमणातून वाचलेले लोक आहेत अन् त्यांची नवी पिढी आहे. त्यांना तेथील भाषेत ‘हिबाकुशा’ असे संबोधले जाते. अणूबाँबच्या आक्रमणातून वाचलेले असल्याने साहजिकच त्यांनी अणूबाँबची दाहकता, त्याचे होणारे भीषण परिणाम यांची झळ मोठ्या प्रमाणात सोसली असणार ! तशी स्थिती पुन्हा उद्भवू नये किंवा आपल्यासह अन्य देशांनीही आण्विक शस्त्रांच्या आहारी जाऊ नये, हा हेतू बाळगून या लोकांनी अगदी तळागाळात जाऊन आंदोलने केली आहेत. त्यांनी जे अनुभवले, त्यातून ते शिकले आणि जगाला विनाशाच्या खाईत लोटण्यापासून वाचवण्यासाठी धडपडले, अशांच्या प्रयत्नांना खरोखरच अभिवादन करायला हवे. ‘नॉर्वेजियन नोबेल समिती’ने त्यांच्या परिश्रमांची नोंद घेऊन त्यांना शांततेचा ‘नोबेल’ पुरस्कार बहाल केला, हे स्तुत्य आणि अभिनंदनीयच आहे. या समितीला यंदा शांततेच्या पुरस्कारासाठी एकूण २८६ अर्ज प्राप्त झाले होते. त्यांपैकी ८९ अर्ज संघटनांचे होते. त्यामध्ये ‘निहोन हिडानक्यो’ ही संघटना विजेती ठरली. या संघटनेच्या अथक प्रयत्नांमुळे गेल्या ८० वर्षांत कोणत्याही युद्धात आण्विक शस्त्रांचा वापर झाला नाही. हे त्यांचे किती मोठे योगदान आहे ! जपानची ही पिढी महत्कार्य करत आहे. त्यामुळे त्यांचे योगदान विसरता कामा नये. एरव्ही तथाकथित मानवतावादाचा उमाळा आलेल्या किंवा मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याची ओरड करणार्या संघटनांकडून जपानच्या या संघटनेचे कौतुक झाल्याचे ऐकिवात नाही. आता हे मानवतावादी मुखवटे कुठे गेले ?
सध्या विश्वात राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये विनाशकारी संघर्ष मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. मग तो पश्चिम आशिया असो, युक्रेन-रशिया असो, इस्रायल-लेबनॉन-इराण किंवा सुदान असो, त्यांच्यातील संघर्षाचा परिणाम वैश्विक स्तरावर अल्प-अधिक प्रमाणात जाणवतो. त्यामुळे बर्याच ठिकाणी युद्ध पेटलेले आहे. ते कधी शमेल सांगता येत नाही. काही ठिकाणी युद्धाचे काळे ढग दिसत आहेत. ‘तिसरे महायुद्ध कधी भडकेल ?’, याचा नेम नाही. अशा स्थितीत निःशस्त्रीकरणाचे काम करणार्या आणि अणूबाँबला विरोध करणार्या संस्थेला शांततेचा पुरस्कार घोषित होणे महत्त्वाचे आहे. प्रतिवर्षी हा पुरस्कार देण्यात येत असला, तरी ‘शांततेचे नोबेल’ अनेकदा वादग्रस्त ठरते. ‘अमुक व्यक्ती किंवा संघटना यांना ते मिळायला हवे होते’, असे काहींना वाटते. त्यामुळे या पुरस्काराची योग्य-अयोग्य दृष्टीने नेहमीच चर्चा होते. प्रत्येकच वर्षी सर्वांना न्याय देता येईल, असे नव्हे. पुरस्कार कुणाला मिळाला, यापेक्षा त्यांचे कार्य किती महान आहे, याकडे पहाणे महत्त्वाचे ठरते.
‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ कधी होणार ?
आज प्रत्येकच राष्ट्र शस्त्रनिर्मितीच्या कार्यात गुंतलेले आहे. काही राष्ट्रे खरोखर संरक्षणक्षेत्र बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडील शस्त्रे अद्ययावत करत आहेत; पण काही राष्ट्रे केवळ विध्वंसाचीच स्वप्ने पहात आहेत. एकमेकांच्या उरावर बसून त्यांचे अहित चिंतत आहेत. ‘दुसर्याला कसे नष्ट करू आणि आपण सर्वश्रेष्ठ, बलवान कसे होऊ ?’, हाच विचार त्यांच्या मनात आहे. याची परिणती अणूशक्तीच्या विस्फोटात होऊ शकते. ‘जगात कुठेही अणूबाँब किंवा आण्विक शस्त्रांचा वापर होऊ नये’, अशी मानसिकता अभावानेच आढळते. त्यामुळे सुख, शांती, समाधान यांच्यासाठी प्रयत्न होतांना दिसत नाहीत. ‘हिंसक वृत्ती’ आणि ‘सत्तेची महत्त्वाकांक्षा’ यांवरच जगरहाटी चालू आहे. अशाने विनाशच ओढवेल, हे सत्य ठाऊक असूनही त्यात कुणालाही स्वारस्य नाही. शांतता प्रस्थापित करण्याचे कार्य जपानची संघटना करत आहे; पण दुर्दैवाने अनेक राष्ट्रे विनाशाला कारणीभूत होण्यातच गुंतलेली आहेत. खरेतर अण्वस्त्रांचा भूपृष्ठावर होणारा परिणाम, त्यातून निर्माण होणारा किरणोत्सर्ग, भूकंपीय क्रियाकलाप यांचा विचार होणे आवश्यक आहे; पण त्या दिशेने वाटचाल होत नाही. कुणीही माघार घेत नाही. जगात असे अनेक देश आहेत, ज्यांना युद्ध नको; मात्र ज्या वेळी युद्धाला आरंभ होतो, त्या वेळी अनेक देश त्यात भरडले जातात. हाच आतापर्यंतचा इतिहास आहे. अशा वेळी सुक्यासमवेत ओलेही जळते. त्यामुळे युद्ध टाळणे, हेच शहाणपण आहे. ही सर्व प्रतिकूलता काय सांगते ? ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या उक्तीचा विचार करायला हवा.
एका अहवालानुसार नुकतेच उघड झाले आहे की, चीनने आणखी एका दशकात १ सहस्र नवीन अण्वस्त्रे बनवण्याची योजना आखली आहे. अण्वस्त्रांची ही ईर्ष्या कधी न्यून होणार ? ती न्यून होणे महत्त्वाचे आहे; कारण देश केवळ शस्त्रास्त्रांच्या बळावर चालत नाही, त्यासाठी शांततेचाच पाया हवा. हे वास्तव जपानने जाणले आणि विश्वाला वाचवण्याचा वसा घेतला. त्यामुळे त्यांचे कार्य विश्वोद्धारक ठरते. आण्विक शस्त्रे जगासाठी सर्वांत विनाशकारी आहेत. ही शस्त्रे नष्ट करण्यातच सर्वांचे आणि जगाचे हित आहे, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे.
वर्चस्ववादाला नष्ट करा !
जपानच्या संघटनेला मिळालेला पुरस्कार पहाता जगभरात शांतता प्रस्थापित होण्यासाठी सर्वांनीच संघटितपणे प्रयत्न करायला हवेत. कुणी एकट्या-दुकट्याने प्रयत्न करून भागणार नाही. संयुक्त राष्ट्रांनीच यासाठी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. त्यातूनच विश्वभरात शांती निर्माण होऊ शकते. शांतीचा शक्तीशाली संदेश देणे कितीही प्रेरणादायी असले, तरी वर्चस्ववादापुढे त्याचा तितका निभाव लागत नाही. चर्चेतून मिळवलेला विजय श्रेष्ठ असतो; पण वेळप्रसंगी ‘ठकास महाठक’ व्हावेच लागते. ‘अरे’ला ‘का रे’ म्हणावेच लागते. श्रीकृष्णानेही राजशिष्टाईच्या प्रसंगात आधी शांती पत्करली होती. विनाश टाळण्याचे आवाहनही केले होते; पण परिस्थिती लक्षात घेता शांतीदूत असणार्या श्रीकृष्णाने कृष्णनीती अवलंबत युद्धाचा मार्ग सर्वांनाच स्वीकारायला लावला. भगवान श्रीकृष्ण आपल्यासाठी आदर्शच आहेत. प्रत्येकाने या सर्वांतून बोध घेऊन राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क आणि संवेदनशील रहावे !
आण्विक शस्त्रास्त्रांच्या हव्यासापोटी विश्वातील अनेक राष्ट्रे विनाशाच्या खाईत लोटली जात आहेत, हे वास्तव जाणा ! |