दादर रेल्‍वेस्‍थानकाबाहेरील रस्‍त्‍याला मद्यपींच्‍या अड्डयाचे स्‍वरूप !

रस्‍त्‍यावर मद्याच्‍या रिकाम्‍या बाटल्‍यांचा खच !

दादर (पूर्व) रेल्‍वेस्‍थानकाबाहेरील ‘भारत वाईन’च्‍या पुढे मद्याच्‍या रिकाम्‍या बाटल्‍यांचा पडलेला खच

मुंबई – दादर (पूर्व) रेल्‍वेस्‍थानकाबाहेर रस्‍त्‍याला लागून असलेल्‍या ‘भारत वाईन’ या मद्यविक्रीच्‍या दुकानात सायंकाळनंतर मद्य विकत घेणारे बहुतांश जण तेथेच मद्य पितात आणि मद्याच्‍या बाटल्‍या मात्र रस्‍त्‍यावर टाकतात. त्‍यामुळे येथील रस्‍ता आणि पादचारी मार्ग यांना मद्याच्‍या अड्डयाचे स्‍वरूप आले आहे. सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत या रस्‍त्‍याच्‍या कडेला मद्याच्‍या रिकाम्‍या बाटल्‍यांचा खच पडतो. (प्रशासनाला हे दिसत नाही का ? प्रशासनाकडून संबंधितांना याविषयी खडसवाले का जात नाही ? – संपादक)

अशा प्रकारे सायंकाळनंतर नियमित मद्यपी ‘भारत वाईन’च्‍या बाहेर पादचारी मार्गावर मद्यपींचा मद्य पिण्‍याचा कार्यक्रम उघडपणे चालू असतो. मद्यविक्रीच्‍या दुकानामध्‍ये परमिट रूमसाठी अनुमती असेल, तरच तेथे मद्य पिता येऊ शकते. अन्‍यथा मद्यविक्रीच्‍या दुकानात किंवा दुकानाच्‍या बाहेर मद्य प्‍यायल्‍यास मद्यपी आणि मद्यविक्रेता यांवर कायदेशीर कारवाई केली जाते. दादर रेल्‍वेस्‍थानकासारख्‍या मुंबईतील रहदारीच्‍या आणि मध्‍यवर्ती स्‍थानकाच्‍या बाहेरील ‘भारत वाईन’सह अन्‍य मद्यविक्री दुकानांबाहेर ‘परमिट रूम’ची अनुमती नसतांना उघडपणे मद्य पिण्‍याचे प्रकार चालत असूनही उत्‍पादन शुल्‍क विभाग, पोलीस किंवा महानगरपालिका प्रशासन यांच्‍याकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. (नियमबाह्य वर्तन करणार्‍या अशा दुकानांवर बंदीच घालायला हवी ! – संपादक)

संपादकीय भूमिका

रस्‍त्‍याची अशी स्‍थिती होणे मुंबईसारख्‍या शहरासाठी लाजिरवाणे !