नवी मुंबईच्या अतिरिक्त आयुक्तपदी डॉ. अमोल शिंदे
नवी मुंबई – महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी डॉ. अमोल शिंदे यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. मागील अनेक महिन्यांपासून शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त २ या पदांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. आता त्यांच्या जागी डॉ. शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. शिंदे यांच्याकडे परिमंडळ २, अग्नीशमन विभाग, सचिव विभाग, विधी विभाग, निवडणूक, क्रीडा आणि सांस्कृतिक विभाग, वाहन आणि यांत्रिकी विभाग, उद्यान आणि वृक्षप्राधिकरण विभाग अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभाग, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण विभाग, जनगणना विभाग, विष्णुदास भावे नाट्यगृह संगणक विभाग, तसेच होल्डिंग पॉण्डस, मोठे नाले यांची स्वच्छता आणि गाळ काढणे आदी विभाग आहेत.
आचारसंहितेपूर्वी महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ अधिकार्यांपासून अन्य अधिकारीही प्रतिनियुक्तीने आले आहेत. यामध्ये उपायुक्त नयना ससाणे, सहाय्यक आयुक्त सतीश जाधव, डॉ. श्रीकांत तोडकर यांचा समावेश आहे. डॉ. श्रीकांत तोडकर यांची बेलापूर विभाग अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बेलापूर विभाग अधिकारी प्रबोधन मावाडे यांची तुर्भे विभाग अधिकारीपदी, तुर्भे विभाग अधिकारी भरत धांडे यांची दिघा विभाग अधिकारी म्हणून स्थानांतर करण्यात आले आहे.