मनसुख हिरेन खून प्रकरणातील आरोपी कबुलीजबाब मागे घेणार !
मुंबई – व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी मनीष सोनी याने न्यायदंडाधिकार्यांपुढे नोंदवलेला कबुलीजबाब मागे घ्यायचा असल्याचे पत्र राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा कायद्याच्या अंतर्गत स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाला पाठवले आहे. न्यायालयाने अन्वेषण यंत्रणेला २५ ऑक्टोबरपर्यंत याविषयी भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला आहे.
१५ ऑक्टोबर या दिवशी मनीष सोनी याने पाठवलेले पत्र विशेष न्यायालयाला प्राप्त झाले आहे. वर्ष २०२१ मध्ये प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाच्या बाहेर मनसुख हिरेन यांची गाडी आढळली होती. या गाडीत स्फोटके होती. यानंतर हिरेन यांची हत्या झाली होती.
मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी मनीष सोनी आणि सतीश मोथकुरी यांना अटक केली आहे. माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा जबाब मनीष सोनी यांनी दंडाधिकार्यांपुढे दिला होता. मनीष सोनी सध्या पुणे येथील येरवडा कारागृहात आहेत. या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मा यांसह अन्य काही माजी पोलीस यांसह १० जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.