सोलापूर येथे तक्रारींसाठी प्रादेशिक परिवहन विभागाचा स्वतंत्र ‘टोल फ्री’ क्रमांक !

रिक्शाभाड्यासह अन्य तक्रारींसाठी क्रमांकाचा उपयोग

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर – शहरात असणार्‍या रिक्शा, खासगी वाहन चालक यांनी प्रवाशांना भाडे नाकारणे, अयोग्य वर्तणूक करणे, अधिक भाडे आकारणे अशा संदर्भात परिवहन आयुक्त कार्यालयात पत्र, तसेच ई-मेलद्वारे तक्रारी प्राप्त होत आहेत. त्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर यांनी ९४२०५६४५१३ हा ‘टोल फ्री’ क्रमांक घोषित केला आहे. त्यावर प्रवासी तक्रारी नोंद करू शकतात. तरी याचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी केले आहे. (जर सोलापूर येथील प्रादेशिक परिवहन विभाग अशा प्रकारे तक्रारी नोंदवण्यासाठी क्रमांक घोषित करते, तर राज्यातील अन्य प्रादेशिक परिवहन विभागांच्या वतीनेही असे क्रमांक घोषित होणे अपेक्षित आहे. त्यामुळे प्रवाशांना त्या त्या जिल्ह्यांमध्ये तक्रारी करणे शक्य होईल !- संपादक)

या संदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी पंढरपूर येथे जाऊन वारकरी आणि प्रवासी यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. यानंतर रिक्शाचालकांडून आकारण्यात येणार्‍या अवास्तव भाड्याविषयी सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन तेथील अधिकार्‍यांची भेट घेऊन हा प्रकार लक्षात आणून दिला होता. याच समवेत प्रवाशांना तक्रारी नोंदवण्यासाठी असा क्रमांक घोषित होण्यासाठी सुराज्य अभियानाच्या वतीने निवेदन देण्यात आले होते.