जयसिंगपूर (कोल्हापूर) : हिंदुत्वनिष्ठांनी जाब विचारताच भगवा ध्वज परत उभारला !
जयसिंगपूर येथे आचारसंहितेच्या नावाखाली भगवा ध्वज हटवला
जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) – राज्यातील विधानसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता नुकतीच लागू झाली आहे. यामध्ये विविध पक्षांचे चिन्हांकित भगवे ध्वज काढावेत, अन्य भगवे ध्वज सरसकट काढू नयेत, अशा सूचना असतांना १८ ऑक्टोबरला कोल्हापूर-सांगली जिल्हा मार्गावरील जयसिंगपूर येथील क्रांती चौकातील भगवा ध्वज नगरपालिकेच्या वतीने उतरवण्यात आला. ही घटना कळताच हिंदुत्वनिष्ठांनी नगरपालिका प्रशासनास जाब विचारला. जाब विचारल्यावर लगेचच प्रशासनाने हा भगवा ध्वज हिंदुत्वनिष्ठांना परत दिला. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी हा ध्वज पूर्ववत् क्रांती चौकात दिमाखात फडकावला. (नगरपालिकेच्या कर्मचार्यांना पक्षांचे आणि अन्य ध्वज ओळखता येत नाहीत का ? – संपादक)
या पार्श्वभूमीवर सकाळी ही घटना घडल्यावर दुपारी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून शिरोळ येथे हिंदु राष्ट्र्र समन्वय समितीचे शिरोळ तालुका समन्वयक आणि कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. भगवंतराव जांभळे, तसेच सकल हिंदु समाज, जयसिंगपूर यांच्या वतीने शिरोळ तहसीलदार अनिल हेळकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यावर तहसीलदारांनी ‘जयसिंगपूर नगरपालिकेला योग्य त्या सूचना देऊ’, असे सांगितले.
जयसिंगपूर येथे आचारसंहितेच्या नावाखाली #भगवे_ध्वज प्रशासनाने काढलेले हे ध्वज हिंदुत्ववाद्यांनी पुन्हा फडकवले……
भगवे ध्वज राजकीय पक्षाचे नव्हे तर धर्माचे व हिंदुत्वाचे प्रतीक आहे त्यामुळे भगवे ध्वज काढण्यात येऊ नयेत असे निवेदन हिंदुराष्ट्र समन्वय समितीच्या वतीने… pic.twitter.com/kqyHmBgjg4— Sunil Ghanwat🛕🛕 (@SG_HJS) October 17, 2024
या प्रसंगी भाजप जिल्हा चिटणीस श्री. राजेंद्र दाईंगडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी शहर सेनाध्यक्ष श्री. अनुप दाईंगडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वयंरोजगार विभाग जयसिंगपूर शहर उपसंघटक श्री. सुमंत रत्नपारखे, संभाजीनगर येथील श्री. महेश माने, श्री इंदर चौधरी आणि श्री. वेदांत पोतदार, शिरोळ येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. रवींद्र महात्मे हे उपस्थित होते.