शुभम लोणकर विरोधात ‘लूकआऊट’ नोटीस !
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शुभम लोणकर याच्या विरोधात दिसताच क्षणी अटक करण्याची (लूकआऊट) नोटीस काढली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर शुभम लोणकर यांच्या ‘शुबू लोणकर महाराष्ट्र’ या ‘फेसबुक’ खात्यावरून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे दायित्व स्वीकारणारा संदेश प्रसारित करण्यात आला होता.
शुभम लोणकर हा अकोला जिल्ह्यातील अकोट येथील रहिवासी आहे. पोलिसांनी तेथे चौकशी केली असता तो पुणे येथे स्थायिक झाल्याचे समजले. पुणे येथे धाड घालून पोलिसांनी शुभम याचा भाऊ प्रवीण लोणकर यांना कह्यात घेतले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलीस शुभम लोणकर, शिवा गौतम आणि महंमद झिशान अख्तर यांचा शोध घेत आहेत. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणार्यांपैकी धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंह यांना पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे. गोळीबार करणार्यांमध्ये शिवा गौतम सहभागी असून शुभम लोणकर आणि महंमद झिशान अख्तर यांनी हत्येसाठी सहकार्य केल्याचे पोलीस अन्वेषणात आढळून आले आहे.