स्वच्छता अभियानात कोल्हापूर जिल्ह्यातील शेळकेवाडी ग्रामपंचायत प्रथम !
कोल्हापूर – ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना’च्या वर्ष २०२२-२३ अंतर्गत विभागस्तरीय समितीने केलेल्या पडताळणीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती उपआयुक्त (विकास) तथा विभागस्तरीय पडताळणी समितीचे सदस्य सचिव विजय मुळीक यांनी दिली आहे. यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक म्हणून शेळकेवाडी ग्रामपंचायतील १२ लाख रुपये, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगावला द्वितीय क्रमांकासाठी ९ लाख रुपये, तर सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील कवठे ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकासाठी ७ लाख रुपये पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील दरेवाडी ग्रामपंचायतीला स्व. वसंतराव नाईक पुरस्कार-घनकचरा सांडपाणी आणि मैला गाळ व्यवस्थापन, सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील सांडगेवाडी ग्रामपंचायतीला पाणी आणि गुणवत्ता, तसेच पाणी व्यवस्थापनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील गोयेगाव ग्रामपंचायतीला स्व. आबासाहेब खेडेकर (शौचालय व्यवस्थापन) प्रत्येकी ७५ सहस्र रुपये रकमेचा विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, असेही मुळीक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.