अमेरिकेमध्ये पैसा मिळतो; परंतु भारतासारखे समृद्ध जीवन नाही ! – क्रिस्टेन फिचर, अमेरिका

भारतातील सामाजिक समृद्ध आणि सांस्कृतिक जीवनाचे महत्त्व दर्शवणारे बोल !

‘स्काईफिश डेव्हल्पमेंट’ या आस्थापनामध्ये ‘कंटेंट क्रिएटर’ (सामुग्री निर्माती) म्हणून काम करणार्‍या क्रिस्टन फिशर या गेली २ वर्षे त्यांच्या परिवारासह देहली येथे रहात आहेत. क्रिस्टेन फिचर यांनी अमेरिकेहून भारतात स्थलांतर करण्याचे कारण एका चित्रफितीद्वारे सविस्तर सांगितले आहे. ‘अमेरिकेतील त्यांच्या घराच्या तुलनेत भारतातील जीवन अधिक दर्जात्मक आहे’, असे त्यांचे म्हणणे आहे. भारतातील बहुतांश लोक ‘भारताच्या तुलनेत अमेरिका किंवा इंग्लंड येथील जीवन आरामदायी अन् सुंदर आहे’, असे मानतात. भारतातील छोट्या शहरांमधील लोक विदेशात जाऊन परत देशात आल्यानंतर त्यांना अधिक आदर किंवा मान दिला जातो; परंतु गेल्या २ वर्षांपासून आपल्या कुटुंबासह भारतात रहात असलेल्या अमेरिकी महिलेने जे सांगितले ते वेगळे होते.

क्रिस्टेन फिचर

१. भारत व्यक्तीमत्त्व विकास करण्यास आणि जीवनात सार्थकता मिळवण्याचा शोध घ्यायला शिकवतो !

क्रिस्टेन फिचर म्हणाल्या, ‘‘मी अमेरिका सोडून भारतात का आले ? हा प्रश्न मला बर्‍याच वेळा विचारला जातो. अमेरिका वगैरे देशांविषयी लोकांच्या मनात नेहमी वेगळा विचार असतो; परंतु अमेरिकेतील लोक सामाजिक दृष्टीकोनातून एकाकी असतात. अमेरिका पुष्कळ सुंदर आहे आणि मी तिथे वाढलेली आहे, यांविषयी वाद नाही; परंतु तिथे प्रत्येक जण स्वतःविषयीच विचार करतो. मला वाटते की, माझी मुले भारतात अधिक यशस्वी जीवन जगत असून भविष्यातील काळासाठी सिद्ध होत आहेत. त्यांच्याजवळ एवढे समृद्ध जीवन, अनुभव आणि समाज असेल, जो त्यांना अमेरिकेमध्ये कधीही मिळालेला नसेल. अमेरिका पैसे कमवण्यावर लक्ष केंद्रीत करणार्‍या लोकांना आकर्षित करत असेल, तर भारत व्यक्तीमत्त्व विकास आणि जीवनात सार्थकता मिळवण्याचा शोध घेणार्‍या लोकांना चांगले जीवनमान देऊ शकतो.’’

२. भारतात जीवन, बुद्धी आणि शारीरिक स्वास्थ्य हे पुष्कळ चांगले असते ! – विदेशी नागरिकांचे अभिप्राय

या चित्रफितीविषयी अनेक अभिप्राय आले. एकाने लिहिले, ‘अमेरिकेत पैसा मिळवणे सोपे नाही. अमेरिकेत रहाण्याची आवड अधिक आहे. अमेरिकेच्या तुलनेत भारताची खरेदीची शक्ती आहे आणि भारतात विविध सामाजिक, आर्थिक सक्षम पार्श्वभूमी असलेले लोक एकजुटीने रहातात.’ अन्य एकाने सांगितले, ‘अमेरिकेच्या तुलनेत भारतात महिला सुरक्षित आहेत.’ एका विदेशी नागरिकाने सांगितले, ‘मी तिबेटमधील नागरिक आहे. माझा जन्म आणि माझे पालनपोषण भारतात झाले आहे; परंतु आता मी डच नागरिक आहे. मी जेव्हा भारतात होतो, तेव्हा माझे जीवन, बुद्धी आणि शारीरिक स्वास्थ्य हे पुष्कळ चांगले होते. भारतात कधीही तुम्हाला एकटेपणा जाणवत नाही. पुढच्या वर्षी मी पुन्हा भारतात जाण्याचा विचार करत आहे.’ अन्य आणखी एकाने सांगितले, ‘अमेरिकेमध्ये राहिल्यावर मला कधीही घरी असल्याप्रमाणे वाटले नाही. माझे घर नेहमी भारतच राहील.’

(जे लोक भारताला मागास समजतात आणि अमेरिकेसह अन्य पाश्चात्त्य राष्ट्रांना प्रगत समजतात, त्यांना क्रिस्टेन फिशर अन् अन्य विदेशी नागरिक यांनी भारताविषयी दिलेले अभिप्राय म्हणजे एक चपराकच आहे ! – संपादक)