Johnson & Johnson Cancer : बेबी पावडरमुळे झाला कर्करोग : ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ आस्थापन पीडित व्यक्तीला १२६ कोटी रुपये हानीभरपाई देणार !


हर्टफोर्ड (कनेक्टिकट) – अमेरिकेच्या कनेक्टिकट राज्यातील इव्हान प्लॉटकिन या व्यक्तीने ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ या आस्थापनावर आरोप केला होता की, अनेक वर्षांपासून या आस्थापनाच्या बेबी पावडरचा वापर केल्यामुळे त्यांना मेसोथेलियोमासारखा दुर्मिळ कर्करोग झाला आहे. या व्यक्तीने त्याच्या आजाराचे निदान झाल्यानंतर, तसेच त्यानंतर उपचार करून आजारातून बरे झाल्यानंतर वर्ष २०२१ मध्ये आस्थापनाच्या विरोधात खटला प्रविष्ट (दाखल) केला होता. न्यायमूर्तींनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि सखोल चौकशी केली. यात ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ आस्थापनाला दोषी ठरवून याचिकाकर्त्याला १२६ कोटी रुपये हानी भरपाई देण्याचा आदेश आस्थापनाला दिला.

दुसरीकडे, ‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या वतीने एरिक हास यांनी न्यायाधिशांच्या चुकीच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ची ‘बेबी टॅल्क’ सुरक्षित असून त्यात ‘एस्बेस्टस’ नाही, हे चाचणीअंती सिद्ध झाले आहे. अशा स्थितीत या बेबी पावडरमुळे कोणत्याही प्रकारचा कर्करोग होत नाही.

अमेरिकन फार्मा आस्थापन ‘जॉन्सन अँड जॉन्सन’चा भारतात मोठा व्यवसाय आहे आणि ते दीर्घकाळापासून देशात बेबी पावडरची विक्री करत आहे.