काणकोण येथील मंदिरांतील चोर्यांच्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी
|
काणकोण, १६ ऑक्टोबर – काणकोण येथे मंदिरांमध्ये होणार्या चोरीच्या प्रकरणांची जलद गतीने चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी गोमंतक मंदिर महासंघ आणि स्थानिक मंदिरांचे विश्वस्त यांनी काणकोण येथील उपजिल्हाधिकारी मधू नार्वेकर, काणकोण येथील पोलीस निरीक्षक हरिश राऊत देसाई आणि कुंकळ्ळी येथील पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी उपजिल्हाधिकारी मधू नार्वेकर यांनी मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी पोलिसांसमवेत बैठक आयोजित करणार असल्याचे म्हटले आहे. प्रशासन आणि पोलीस यांना निवेदन देतांना माशे येथील श्री निराकार मंदिराचे अध्यक्ष श्री. नारायण प्रभु गावकर आणि सचिव श्री. राजेंद्र वारीक; लोलये येथील श्री केशव मंदिराचे अध्यक्ष श्री. विठ्ठल (प्रदीप) प्रभु माळयार, पैंगीण येथील श्री परशुराम पंचैग्राम देवस्थानचे आणि श्री नरसिंह मंदिराचे पदाधिकारी श्री. ज्ञानानंद प्रभु गावकर; पाटणे-कोळंब येथील श्री देवगीपुरुष मंदिराचे श्री. रघुवीर कोमरपंत आणि गोमंतक मंदिर महासंघाचे प्रतिनिधी सर्वश्री. रामानंद प्रभु, प्रदीप पैंगीणकर आणि गोविंद लोलयेकर यांची या वेळी उपस्थिती होती.
निवेदनात म्हटले आहे की, ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रारंभी लोलये, काणकोण येथील श्री दामोदर देवस्थानच्या गर्भगृहात प्रवेश करून अज्ञाताने ६ सहस्र रुपये चोरले. या वेळी चोरट्यांनी जवळच्या श्री केशव देवस्थानमधील श्री महादेव, श्री केशव, श्री ब्रह्मादेवी आणि श्री मारुति देवतांसमोरील ६ दानपेट्याही फोडल्या. गोव्यात वर्ष २०२२ मध्ये एकूण ६ ठिकाणी, वर्ष २०२३ मध्ये एकूण १४ ठिकाणी आणि वर्ष २०२४ मध्ये आतापर्यंत एकूण ११ ठिकाणी मंदिरांमध्ये चोर्या झालेल्या आहेत. मंदिरांना लक्ष्य करणारी टोळी कार्यरत झाली आहे. मंदिरातील वाढत्या चोर्यांच्या घटनांमुळे मंदिरे असुरक्षित बनू लागली आहेत. मंदिरे ही हिंदूंची श्रद्धास्थाने असल्याने त्यांच्या पावित्र्यासह त्यांचे रक्षण करणे आवश्यक आहे.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? |