समुद्रकिनारपट्टी भागात तेथील पोलीस ठाण्यांतील ४० टक्के पोलीस गस्त घालणार
पणजी, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – गोव्याच्या किनारपट्टी भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाने रात्रीच्या वेळी गस्त घालणार्या पोलिसांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
याविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘किनारपट्टी भागातील पोलीस ठाण्यांतील ४० टक्के पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालतील, तर इतर भागांत २० टक्के पोलीस रात्रीच्या गस्तीवर असतील. किनारपट्टी भागात शॅक किंवा क्लब या ठिकाणी झालेल्या भांडणांच्या प्रकरणी संशयितांना अटक करण्यात आली आहे. मारहाणीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. या प्रकरणांत दोषी असलेल्यांवर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. सध्या राज्यात होणार्या चोर्यांना आळा घालण्यासह कायदा आणि सुव्यवस्था राखणे, यासाठी शासनाचे प्रयत्न चालू आहेत. याचाच एक भाग म्हणून रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे. याखेरीज रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीक्षेपकावरून मोठ्या आवाजात संगीत वाजवणार्यांवर नियमाप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल.’’
कळंगुट येथे गेल्या काही दिवसांत एका प्रसिद्ध नाईट क्लबमधील ‘बाऊंसर’च्या (खासगी सुरक्षारक्षकांच्या) गटाने स्थानिक २ युवकांना अमानुष मारहाण करणे, दांडीया खेळून घरी जातांना रात्री स्थानिक २ मुलींशी पर्यटक आणि दलाल यांनी असभ्य वर्तणूक करणे आणि ३ पशूवैद्यांना स्थानिकांनी अमानुष मारहाण करणे या हिंसक घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या विशेषत: महिलांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलीस खात्यातील सर्व श्रेणींतील कर्मचार्यांचे स्थलांतर होणार
गोवा पोलीस खात्यातील सर्व श्रेणींतील कर्मचार्यांचे स्थलांतर येत्या ८ दिवसांत करण्यात येईल. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘पोलीस खात्यातील पोलीस हवालदारांचे स्थलांतर आधीच करण्यात आले आहे. आता येत्या ८ दिवसांत पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांचे स्थलांतर करण्यात येईल.’’