‘वन्दे मातरम्’ला विरोध आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यालयावर आक्रमण करणारे इद्रिस नायकवडी यांची आमदारकी रहित करा !

खासदार संजय राऊत यांची मागणी

संजय राऊत

मुंबई – सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘वन्दे मातरम्’ गीताला विरोध करणारे आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यालयावर आक्रमण करणारे सांगली, मिरज अन् कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर इद्रिस नायकवाडी यांना राज्यपालनियुक्त आमदारकी दिलीच कशी ? इद्रिस नायकवडी यांचा इतिहास काय आहे ? इद्रिस नायकवडी यांना राज्यपाल नियुक्त आमदार करता, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता. इतके भंपक लोक आहात का तुम्ही ?, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी १६ ऑक्टोबर या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत टीका केली.

इद्रिस नायकवडी

१. सरकारकडून राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या १२ जागांपैकी ७ जागांवर आमदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून इद्रिस नायकवडी यांनाही उमेदवारी मिळाली. या निवडीला खासदार संजय राऊत यांनी कडाडून विरोध केला.

२. राऊत पुढे म्हणाले, ‘‘हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यालयावर आक्रमण करणारे इद्रिस नायकवडी यांची नीती काय आहे ?, हे सर्वांना समजले आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांमधून इद्रिस नायकवडी यांचे नाव मागे घेण्यात यावे.’’

३. ते पुढे म्हणाले की, विधान परिषदेच्या आमदार नियुक्तीच्या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट असतांना आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी घाईघाईने शपथविधी करण्यात आला. आमदारांची नियुक्ती घटनाबाह्य आहे. राज्यपालांनी या नियुक्त्या करतांना कोणती विशेष माहिती घेतली ?


इद्रिस नायकवडी यांच्यावर दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयावर आक्रमण केल्याचा होता आरोप

२ नोव्हेंबर २००५ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखावर आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर इद्रिस इलियास नायकवडी यांनी त्यांच्या समर्थकांच्या साहाय्याने ३ नोव्हेंबर २००५ या दिवशी मिरज येथील दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्यालय आणि कोरे रुग्णालय यांवर आक्रमण करून तोडफोड केली होती. या प्रकरणात ८ वर्षांनी, म्हणजे १८ ऑक्टोबर २०१३ या दिवशी इद्रिस नायकवडी यांच्यासह अन्य ६ संशयित आरोपी यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी निर्दाेष मुक्तता केली होती. त्यावर दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वतीने जिल्हा न्यायालयात अपील करण्यात आले आहे.


संपादकीय भूमिका

‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास नकार देणारे कधीतरी या मातृभूमीशी एकनिष्ठ रहातील का ? असे लोक आमदार झाल्यावर राष्ट्रहित काय साधणार ?अशांना आमदारकी देणे कितपत सयुक्तिक ?