आयुर्वेद, योग आणि ज्योतिषशास्त्र ही भारताची जगाला दिलेली देणगी ! – अतुलशास्त्री भगरेगुरुजी, ज्योतिष अभ्यासक
ज्योतिषांच्या मेळाव्याचे उद्घाटन
पुणे – कोणतेही शास्त्र हे अंतिमत: मानव कल्याणासाठीच विकसित झालेले असून प्रत्येकालाच भविष्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. आपल्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाच्या बळावर प्रत्येकाच्या आयुष्यात प्रकाशाची ज्योत आपण तेवत ठेवली पाहिजे. ज्ञान आणि साधनेची मोठी परंपरा आपल्याला लाभली असून आयुर्वेद, योग आणि ज्योतिषशास्त्र ही भारताची जगाला दिलेली देणगी आहे, असे प्रतिपादन ज्योतिष अभ्यासक अतुलशास्त्री भगरेगुरुजी यांनी येथे केले. बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळ आणि फल ज्योतिष अभ्यास मंडळ यांच्या वतीने कै. पंडित श्रीकृष्ण अनंत जकातदार यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित ज्योतिषांच्या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. राज्यसभेच्या खासदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. या वेळी विविध मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. या वेळी ‘उत्कृष्ट ज्योतिष संस्था’ पुरस्कार मुंबई येथील ‘अभिजित प्रतिष्ठान’ या संस्थेला प्रदान करण्यात आला. लेखक रघुवीर खटावकर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात आला.
या वेळी बोलतांना राज्यसभेच्या खासदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, ज्योतिषशास्त्र हे नित्यनूतन शास्त्र असून आपल्या सनातन संस्कृतीचा तो पाया आहे. पाश्चात्त्यांच्या गोष्टींचे अंधानुकरण करण्याची आवश्यकता नसून भारताला लाभलेल्या दीर्घ ज्ञान परंपरांविषयी अभिमान बाळगला पाहिजे. आपल्या पूर्वजांनी जीवनातील प्रत्येक अंगाला स्पर्श करतील, एवढी सखोल ज्ञाननिर्मिती करून ठेवली आहे. ज्या ग्रहतार्यांच्या शोधाविषयी पाश्चात्त्य देश दावा करतात, ते आपल्या पूर्वजांनी या पूर्वीच लावून ठेवले आहेत.