कार्यापेक्षा सेवेकडे ओढा वाढल्‍यामुळे ईश्‍वरीतत्त्व अनुभवता येणारे देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमातील ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. महेंद्र राठोड (वय ५० वर्षे) !

श्री. महेंद्र राठोड

१. सेवा मिळाल्‍यावर देवाप्रती कृतज्ञतेचा भाव न रहाता कार्याविषयीचे विचार अधिक असणे

‘पूर्वी मला ‘आध्‍यात्‍मिक स्‍तरावरील प्रयत्न कसे करायचे ?’, हे ठाऊक नव्‍हते. त्‍यामुळे माझा कार्याकडे ओढा अधिक असायचा आणि माझ्‍या मनात देवाचा विचार अल्‍प असायचा. ‘देवाने हे कार्य माझी साधना व्‍हावी; म्‍हणून दिलेले आहे, तर माझ्‍या मनामध्‍ये देवाप्रती कृतज्ञतेचा भाव न रहाता ‘कार्य पूर्ण कसे करायचे ?’, याविषयी विचार असायचे.

२. साधकाने सेवा करण्‍यास नकार दिल्‍यावर प्रतिक्रिया येऊन सेवेविषयी काळजीचे विचार येणे आणि ईश्‍वरी तत्त्वाचा लाभ घेता न येणे

साधकाला एखादी सेवा करण्‍यासंदर्भात विचारल्‍यावर त्‍याने ‘जमणार नाही’, असे सांगितल्‍यास माझ्‍या मनात त्‍या साधकाविषयी ‘साधक लहानशी सेवासुद्धा स्‍वीकारत नाही. माझ्‍याकडे साधकसंख्‍या अल्‍प आहे’, ही अडचण त्‍यांना कळत कशी नाही ? आता ही सेवा पूर्ण कशी करायची ?’, अशा प्रतिक्रिया येत असत. त्‍या वेळी माझ्‍या मनात काळजीचे विचार येऊन मला ताणही येत असे. त्‍यामुळे मला त्‍या सेवेतून देवाला अनुभवता येत नसे आणि मला ईश्‍वरीतत्त्वाचा लाभही घेत येत नसे.

३. ‘ईश्‍वराच्‍या इच्‍छेविना काही घडू शकत नाही’, हे लक्षात आल्‍यावर सकारात्‍मक राहून प्रयत्न करता येणे

कालांतराने ‘आध्‍यात्‍मिक स्‍तरावर प्रयत्न कसे करायचे ?’, हे मला लक्षात येऊ लागले. ईश्‍वराच्‍या इच्‍छेविना झाडाचे पानही हलत नाही, तर माझ्‍या जीवनात घडणारा प्रत्‍येक प्रसंग ईश्‍वराच्‍या इच्‍छेनेच घडत आहे. तो प्रसंग ईश्‍वराने माझ्‍या साधनेसाठी आणि माझ्‍यातील स्‍वभावदोष नष्‍ट करून गुण अंगी वाढवण्‍यासाठी घडवला आहे’, असा सकारात्‍मक विचार करून मला प्रयत्न करता येऊ लागले.

४. ‘माझ्‍या साधनेची माझ्‍यापेक्षा देवालाच काळजी अधिक आहे’, असा विचार करून अडचण सोडवता येणे आणि ईश्‍वरी तत्त्व अनुभवता येणे

आता कोणताही प्रसंग घडल्‍यावर माझ्‍याकडून देवाच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त होऊ लागली. ‘माझ्‍या साधनेची माझ्‍यापेक्षा देवालाच अधिक काळजी आहे’, असा विचार करून मला अडचण सोडवता येऊ लागली. ‘ती अडचण सोडवतांना देव माझ्‍या समवेत आहे आणि तोच माझी अडचण सोडवत आहे’, असे लक्षात येऊन त्‍या प्रसंगातून मला ईश्‍वरीतत्त्व अनुभवता येऊ लागले.’

– श्री. महेंद्र देवराम राठोड (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय ५० वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.३.२०२४)