अभाविपच्या ‘शिवमल्हार यात्रे’चे सांगली येथे आगमन !

सांगली, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – शिवराज्याभिषेकाची ३५० वी वर्षपूर्ती आणि अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त सातारा अन् सांगली जिल्ह्यांत प्रवास करणार्‍या ‘अखिल भारतीय विश्व परिषदे’च्या ‘शिवमल्हार यात्रे’चे उद्घाटन नुकतेच सातारा येथे पार पडले. सातार्‍यातील तालुक्यांमध्ये प्रवास करून आता सांगलीत यात्रेचे आगमन झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यासमवेतच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचेही हे ३०० वे जयंती वर्ष सर्वत्र साजरे होत आहे. या दोन्ही विषयांचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) सांगली विभागाद्वारे ‘शिवमल्हार यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शिराळा आणि वाळवा तालुक्यांतील विविध गावांमध्ये यात्रेचे स्वागत करण्यात आले. काही महाविद्यालयांमध्ये मंचीय कार्यक्रमही झाले. यात्रेत शिवमल्हार रथ सिद्ध करण्यात आलेला असून त्यात शिवराय आणि अहिल्यादेवी यांची प्रतीकृती ठेवण्यात आलेली आहे. यात्रेच्या माध्यमातून सकारात्मक वातावरण सिद्ध करून समरसतेचा भाव सर्वसामान्यांत जागृत करणे, हा उद्देश आहे.

विद्यार्थी आणि नागरिक यांना आगामी निवडणुकीत टाळाटाळ न करता, प्रलोभनांना बळी न भुलता आणि ‘नोटा’ पर्यायाचा वापर न करता मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन अभाविप करत आहे. शिवराय आणि अहिल्यादेवी यांनी सकल समाजाला दिलेला समरसतेचा संदेश विद्यार्थी अन् सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवणे, तसेच त्यांच्या विचारांचा जागर चौकाचौकांत आणि महाविद्यालयात करण्यासाठी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.