पेट्रोल पंप चालकांच्या आंदोलनामुळे शहरात इंधनाचा तुटवडा
पुणे – पेट्रोलियम आस्थापनांकडून मागण्या मान्य होत नसल्याने पुण्यातील पेट्रोल पंप चालकांनी आंदोलन चालू केले आहे. त्यामुळे शहरात पेट्रोल, डिझेल यांची टंचाई निर्माण झाली आहे. ‘पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणे’ने पेट्रोल आणि डिझेल यांची वाहतूक बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील ९०० पंपचालक, तसेच सातारा जिल्ह्यातील ५०० पंपचालक सहभागी झाले आहेत. इंधन वाहतुकीसाठी पेट्रोलियम आस्थापनांकडून चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अव्यवहार्य दराने निविदा काढल्या जातात. यामुळे इंधनाची सुरक्षित वाहतूक होत नसून सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होत आहे. पेट्रोलियम मंत्रालय, स्थानिक प्रशासन आणि पेट्रोलियम आस्थापन यांना आंदोलनाची सूचना दिली होती. त्यामुळे जनतेची गैरसोय टाळण्यासाठी पंपावर पेट्रोल, डिझेल योग्य प्रमाणात आणि वेळेवर पोचवण्याचे दायित्व पेट्रोलियम आस्थापनेचे आहे, असे ‘पेट्रोल डीलर्स असोसिएशन’चे अध्यक्ष ध्रुव रूपारेल यांनी सांगितले. इंधन चोरी थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी असोसिएशनने पेट्रोलियम आस्थापनाकडे अनेकदा केली होती. पेट्रोलियम आस्थापनाने इंधन चोरी होऊ नये यासाठी मोठा खर्च करून अत्याधुनिक यंत्रणा बसवली आहे; मात्र अधिकार्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने इंधन चोरी होत आहे.
१. सुरक्षित वाहतुकीसाठी व्यवहार्य दरासह नवीन निविदा काढाव्यात.
२. सुरक्षेकडे दुर्लक्ष करणार्या अधिकार्यांना तात्काळ निलंबित करावे.
३. इंधन चोरीतील अधिकार्यांच्या सहभागाची पोलीस चौकशी व्हावी या मागण्यांवर असोसिएशन ठाम आहे, असे रूपारेल यांनी सांगितले.