संगीत : अध्यात्माचे एक अविभाज्य अंग !
‘खरेतर ‘अध्यात्म’ या विषयावर मी काही भाष्य करावे, एवढा माझा अधिकार नाही; परंतु आपले संत नेहमीच सांगत आले आहेत की, ईश्वरी शक्तीपर्यंत पोेचण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे संगीत ! मी संगीताची अभ्यासक असल्याने संतांच्या या विचारामुळे माझे मंथन चालू झाले.
संगीत म्हणजे गायन, वादन आणि नृत्य या तीन कलांचा संगम आहे. ग्रंथांमध्ये ‘गायन’ या कलेला प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. ‘गायन’ या क्षेत्रात माझा अभ्यास असल्यामुळे ‘अध्यात्माच्या जवळ जाण्यासाठी ‘गायनकला श्रेष्ठ का मानली असावी ?’, याविषयी माझा अभ्यास चालू झाला. यातूनच मला अध्यात्म आणि संगीत यांत काही मूलभूत समानता जाणवली.
‘गायनकलेमुळे काय घडू शकते आणि आपण गायनातून अध्यात्माच्या जवळ कसे पोचू शकतो ?’, याविषयी मला जे समजले, ते मी या लेखात मांडले आहे.
– सुश्री संध्या खांबेटे, अलंकार (संगीत)
सुश्री संध्या खांबेटे यांचा परिचय
सुश्री संध्या खांबेटे या ठाणे येथील असून त्यांनी अखिल गांधर्व महाविद्यालयातून गायनात ‘अलंकार’, ही पदवी प्राप्त केली आहे. ठाण्याचे श्री. वाय्.टी. वैद्य यांच्याकडे त्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले, तसेच पुढे त्यांना कै. चारुशीला दिवेकर, ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. यशवंतबुवा जोशी आणि पं. नारायणराव बोडस यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या त्या पं. विकास कशाळकर यांच्याकडे संगीताचे पुढचे शिक्षण घेत आहेत. गांधर्व महाविद्यालयाच्या ‘डॉक्टरेट’ या पदवीसाठी त्या सध्या अभ्यासरत आहेत. गेली अनेक वर्षे त्या संगीतातील विद्यार्थ्यांना संगीताविषयी मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी आकाशवाणीवर आणि इतर अनेक ठिकाणी शास्त्रीय, तसेच सुगम संगीताचे कार्यक्रम सादर केले आहेत.
लेखातील काही शब्दांचे अर्थ१. कंठ संगीत : ‘मनुष्याने कंठातून गायन करणे’, यालाच ‘कंठ संगीत’, असे म्हणतात. २. सप्तक २ अ. मंद्र सप्तक (नाभीस्थान) : गायन आणि वादन यांमध्ये प्रचलित असलेल्या तीन सप्तकांतील हे पहिले सप्तक आहे. गायक आणि वादक या सप्तकाचा ‘सा, नी, ध, प’, असा उत्तरार्धाचा विशेष करून उपयोग करतात. मंद्र सप्तकातील स्वर गातांना निघणारा नाद हा शरिराच्या नाभीस्थानातून उत्पन्न झालेला असतो. २ आ. मध्य सप्तक (कंठस्थान) : तीन सप्तकांतील हे दुसरे सप्तक आहे आणि म्हणूनच याला ‘मध्य सप्तक’, असे म्हणतात. गायक आणि वादक या सप्तकाचा पूर्णपणे उपयोग करतात. मध्य सप्तकात गातांना निघणारा नाद हा शरिराच्या कंठस्थानातून (गळ्यातून) उत्पन्न होतो. २ इ. तार सप्तक (टाळू ) : संगीतातील तीन सप्तकांपैकी हे तिसरे सप्तक आहे. तार सप्तकातील स्वर गातांना निघणारा नाद हा (तोंडातील) ‘टाळू’ या शरिराच्या स्थानातून निर्माण होतो. ३. आलाप : रागदर्शक स्वरांचा संथ गतीने केलेला विस्तार, म्हणजेच ‘आलाप’ होय. स्वरांचा उच्चार केवळ ‘आऽऽऽ’कारात करणे, म्हणजे ‘आलाप.’ ४. उकार, इकार, मकार : ‘स्वर गातांना ते ‘उ’कारान्त, ‘इ’कारान्त आणि ‘म’कारान्त गाणे’, याला अनुक्रमे ‘स्वर ‘उकार’, ‘इकार’ अन् ‘मकार’, यांत गाणे’, असे म्हणतात. ५. रिदनन : ‘नोम-तोम’, ‘रिदनन’ इत्यादी शब्द स्वरविस्तार आणि आलापी करतांना गायनात वापरले जातात. या शब्दांना अर्थ नसतो. ६. तान : रागातील स्वरांच्या जलद गतीने केलेल्या विस्तारास ‘तान’, असे म्हणतात. ७. खर्ज स्वर : मंद्र सप्तकातील स्वरांना ‘खर्ज स्वर’, असे म्हणतात. ८. आवर्तन : तालाच्या पहिल्या मात्रेपासून वाद्य वाजवण्यास किंवा गाण्यास प्रारंभ करून एक एक मात्रा वाजवत आणि गात पुन्हा पहिल्या मात्रेवर येण्याच्या क्रियेस ‘आवर्तन’, असे म्हणतात. – सुश्री संध्या खांबेटे, अलंकार (संगीत), ठाणे ( ७.१०.२०२४) |
१. शास्त्रीय संगीतातील आसनावरील बैठकीमुळे शरिराला आलेली स्थिरता ही एकाग्रता वाढवण्यास साहाय्यक ठरणे
शास्त्रीय संगीतात कंठ संगीतामध्ये बैठकीला पुष्कळ महत्त्व आहे. बसून गातांना पाठीचा कणा ताठ ठेवून बसण्याची आसनावरील बैठक अतिशय महत्त्वाची आहे. या आसनामुळे शरिराला आलेली स्थिरता ही गायकाच्या मनाची एकाग्रता वाढवण्यास नक्कीच साहाय्य करते. श्वासावर नियंत्रण ठेवून उच्चारलेला प्रत्येक स्वर नक्कीच एकाग्रता वाढवतो.
२. आध्यात्मिक साधना आणि गायन यांतील साधर्म्य
आध्यात्मिक साधना करतांना प्रारंभी आपल्याला ईश्वराच्या एका रूपावर, त्या देवतेच्या नामावर लक्ष केंद्रित करायला सांगितले जाते. एकाग्रता वाढण्यासाठी याचा उपयोग होत असावा. एकाग्रता वाढली की, हळूहळू श्वासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले जाते. मनातील विचारांवर नियंत्रण मिळवता आले की, आपोआप शांतता जाणवू लागते. यामध्ये आपण आपल्या शरिराचाच आधार घेतो. आपल्याला कोणत्याही बाह्य गोष्टीच्या आधाराची आवश्यकता भासत नाही. त्या स्थितीमध्ये ‘आपल्याच श्वासाची लय एकसारखी करणे आणि आपल्याच हृदयाच्या ठोक्यांचा एकाच लयीतील आवाज ऐकणे’, हेच चालू असते.
असेच कंठ संगीतात आढळते. शांत श्वासाच्या आधारे या नादविश्वामध्ये मंद्र, मध्य आणि तार सप्तकांत गायक खेळत असतो. ईश्वरी शक्तीने निर्माण केलेल्या या देहाच्या माध्यमातून ईश्वरानेच निर्मिलेला वायू ठराविक दाबाने बाहेर टाकत आपण त्यानेच निर्मिलेल्या स्वरयंत्रातून स्वरांची निर्मिती करत असतो. पोटाच्या पोकळीत हवा साठवून जणू स्वरांच्या रूपात आपण बाहेरच्या पोकळीत ही हवा सोडत असतो.
‘अशा प्रकारच्या लेखांच्या माध्यमातून ‘अध्यात्म हे संगीताचे मूळ आहे’, याविषयी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय मार्गदर्शन करते’, हे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे वैशिष्ट्य आहे.’
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के), संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (९.१०.२०२४)
३. गायन करतांना सप्तचक्रांवर सकारात्मक परिणाम होऊन गायकाने स्वरांशी तादात्म्य पावणे
भारतीय संगीतात सात स्वर आहेत, त्याप्रमाणे आपल्या शरिरात सात (कुंडलिनी)चक्रे आहेत. गायन करत असतांना खर्जातील स्वरांद्वारे मूलाधारच्रकावर आघात होत असतात. मंद्र, मध्य आणि तार सप्तकात स्वर फिरतांना निर्माण होणारी कंपने मूलाधार चक्रापासून सहस्रारापर्यंत नकळतच आघात देऊन जातात. यामुळे गायकाला आजूबाजूच्या जगाचा विसर पडून तो केवळ स्वरनादात रंगून जातो. गायक स्वरांशी तादात्म्य पावतो, तसेच तो डोळे बंद करून या नादसागरात डुबक्या मारतो. तेव्हा तो स्वतः तर आनंदी होतोच; पण इतरांनाही आनंद देऊन जातो.
४. गायनाने योगक्रियेप्रमाणे कार्य होऊन कुंडलिनी जागृती होणे
‘अध्यात्मामध्ये योगक्रियेलाही पुष्कळ महत्त्व आहे’, असे म्हटले जाते. योगक्रियेमध्ये ‘अनुलोम, विलोम, प्राणायाम आणि आेंकार साधना’, यांसारख्या योगक्रिया महत्त्वाची भूमिका निभावतात. या सर्व योगक्रियांचा अभ्यास केला, तर जाणवते की, यामध्ये श्वासाची भूमिका पुष्कळ महत्त्वाची आहे. थोड्याफार प्रमाणात शास्त्रीय गायनात ‘एका श्वासात घेतलेला १६ मात्रांचा आलाप-तान, उकार, इकार, मकार आणि ‘रिदनन’, यांसारखे शब्द यांतून ‘ॐ’काराचाच भास होतो. गायनात एखाद्या स्वरावर थांबतांना कुंभक करण्याची क्रिया नकळत होते. ‘तालाच्या लयीशी खेळतांना स्वरांच्या हिंदोळ्यावर झुलतांना कुंडलिनीमाताही डोलत असेल (कुंडलिनी जागृती होत असेल)’, असे मला वाटते.
५. कोणत्याही साधनांचा वापर न करता केलेली संगीत-साधना गायकाची सकारात्मक ऊर्जा वाढवणारी ठरणे
गायकाला त्याच्या संगीत-साधनेसाठी कोणत्याही साधनांची आवश्यकता लागत नाही. तो डोळे बंद करून शांत बसून या नादब्रह्मात रमू शकतो. कोणत्याही वाद्याचा आधार न घेता तो स्वरांचे वलय निर्माण करू शकतो. संगीत-साधनेमुळे नकळतच गायकाच्या वाणीत येणारे माधुर्य आणि चेहर्यावरची प्रसन्नता, हे गायकात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे ठरतात.
६. साधनेमुळेच मनाचे परिवर्तन शक्य असणे
कोणी म्हणेल की, कोणतेही काम करतांना त्यात एकाग्रता आवश्यक आहे. ती साधली की, प्रत्येक जीव प्रतिदिन उठता-बसता अध्यात्मच जगत असतो; पण माझ्या मते असे नाही. ‘त्या कामाने निर्माण होणारे कर्म आणि त्याचे फळ’, हेही लक्षात घेतले पाहिजे, उदा. चौर्यकर्म (चोरी) करणारा त्याचे काम एकाग्रतेने करत असेल; पण त्यामुळे त्याच्या मनाची शुद्धी होते का ? त्याच्या मनातले विचार सकारात्मक होतात का ? माझ्या मते नाही. या सूत्रासाठी एक पौराणिक कथा उत्तम आधार आहे. वाल्याचा वाल्मीकिऋषि बनायला त्याच्या कामातील पालट करण्याच्या समवेत साधनाही कारणीभूत ठरली. साधनेमुळेच मनाचे परिवर्तन शक्य झाले. (‘केवळ कर्म केले, म्हणजे मनाची शुद्धी होत नाही. ते कर्म करत असतांना कर्माचा उद्देश लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. ते कर्म करत असतांना ‘माझ्या मनाची शुद्धी होत आहे का ?’, हे पहाणेही आवश्यक आहे, उदा. वाल्या कोळ्याने कर्माला साधनेची जोड दिली; म्हणून वाल्याचे वाल्मीकिऋषि झाले.’- संकलक)
७. प्रकृति और संगीत।
सांसों की लडियां जैसे हो जाती हैं आवर्तन।
तार षड्ज से जैसे सहस्रार को कंपन ॥ १ ॥
उत्पत्ति, स्थिति, लय यही है जीवन का सत्य।
मंद्र, मध्य, तार जैसे इन्हीं का उदाहरण ॥ २ ॥
निसर्ग से निर्मित यह जीवसृष्टि।
वायु के संग डोले सभी के सांसों की गति ॥ ३ ॥
गती, लय ही निसर्गातूनच आपल्यापर्यंत आली आहे. वायू हा न दिसणारा असूनही सृष्टीला डोलायला लावणारा, मायेने गोंजारणारा, तर क्षणात विध्वंस करणारा असतो. याच वायूच्या आधारे आपल्या स्वरयंत्रात निर्माण होणारा नाद सुमधूर स्वर बनून आनंद देतो.
सर्वच कला श्रेष्ठ आहेत. त्यांच्यात एकाग्रता आहे, नवनिर्मिती आहे; परंतु अंतर्मनाचा नाद ऐकून सुमधुर संगीत निर्माण करणारे गायन निसर्गातून लाभलेले आहे. ते त्यालाच अर्पण करतांना आपला अहं निघून जातो आणि आपण नाद-स्वरसमाधीत तल्लीन होतो.’
– सुश्री संध्या खांबेटे, अलंकार (संगीत), ठाणे ( ७.१०.२०२४)
सुश्री संध्या खांबेटे यांच्या वरील लेखाचे संकलन करतांना जाणवलेली सूत्रे !
१. ‘सुश्री संध्या खांबेटे यांच्या लेखाचे संकलन करतांना मला पुष्कळ आनंद आणि उत्साह जाणवत होता.
२. ‘लेखातील शब्दांतून माझ्या चेहर्यावर आनंदाची स्पंदने येत आहेत’, असे मला जाणवले.
३. ‘सुश्री संध्या खांबेटे या खरोखरच संगीत-साधना जगत आहेत’, असे लेख वाचतांना जाणवत होते.
४. लेखातील ‘वायूच्या आधारे आपल्या स्वरयंत्रात निर्माण होणारा नाद सुमधूर स्वर बनून आनंद देतो’, तसेच ‘तालाच्या लयीशी खेळतांना स्वरांच्या हिंदोळ्यावर झुलतांना कुंडलिनीमाताही डोलत असेल (कुंडलिनी जागृती होत असेल)’, असे मला वाटते’, ही वाक्ये वाचत असतांना ‘मीही तसे अनुभवत आहे’, असे मला जाणवले.
५. ‘आपण नाद-स्वरसमाधीत तल्लीन होतो’, हे वाक्य वाचत असतांना मला क्षणभर ध्यान लागल्यासारखे वाटले.’
– सुश्री (कु.) दीपाली होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१०.२०२४)