Message Of Bombs : मित्राच्या ‘एक्स’ खात्यावरून विमानांमध्ये बाँब असल्याचा संदेश पाठवला !
|
मुंबई – एका अल्पवयीन मुलाने मित्राला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी त्याच्या ‘एक्स’ खात्यावरून विमानांमध्ये बॉम्ब असल्याचा संदेश केला. हा अल्पवयीन मुलगा छत्तीसगडमधील असून त्याला पालकांसह सहार पोलीस ठाण्यात उपस्थित होण्याचा आदेश पोलिसांनी दिला आहे.
१. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील ‘६ ई १२७५’ आणि ‘६ ई ५७’ ही इंडिगो आस्थापनाची विमाने, तसेच न्यूयॉर्ककडे निघालेल्या ‘एआय ११९’ या विमानांत ६ आतंकवाद्यांनी ६ किलो आर्.डी.एक्स्. ठेवले आहेत, असा संदेश ‘एक्स’वरील ‘फैजलुद्दीन ६९’ आणि ‘फैजलुद्दीन २७०७७’ या खात्यांवरून इंडिगो अन् एअर इंडियाच्या ‘एक्स’ खात्यांवर पाठवण्यात आला.
२. फैजलुद्दीन निब्रान नावाच्या व्यक्तीने हे संदेश पाठवल्याचे भासवण्यात आले होते. यामुळे १४ ऑक्टोबरला विमानतळावर गोंधळ झाला. इंडिगोची विमाने थांबवून त्यांची संपूर्ण पडताळणी करण्यात आली, तर न्यूयॉर्कला जाणारे विमान देहलीत उतरवण्यात आले.
३. या प्रकरणी सहार पोलिसांनी प्रशांत पालव यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला. अधिक चौकशीनंतर छत्तीसगडमधील एका अल्पवयीन मुलाने मित्राला अडकवण्यासाठी हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले. इयत्ता अकरावीत शिकणार्या या मुलाने मित्रासमवेत भ्रमणभाषचा व्यवसाय चालू केला होता. व्यवसाय बंद पडल्यानंतर मित्राकडून त्या मुलाला ३ लाख रुपये येणे शेष होते. या रागातून त्याने मित्राच्या खात्यावरून हा संदेश पाठवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संपादकीय भूमिकाअसे कृत्य करणार्यांना कठोर शिक्षा केल्याविना पोलीस-प्रशासनाला वेठीस धरण्याचे प्रकार थांबणार नाहीत ! |