अहिल्यानगर येथे विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजनाने दुर्गामाता दौडीची सांगता !
अहिल्यानगर – ‘दुर्गामाता की जय’, ‘पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय’ अशा जयघोषात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कडून शस्त्रपूजन झाले. प.पू. संभाजी भिडेगुरुजी संचलित श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त १० दिवस सावेडी उपनगरातील विविध देवी दर्शनासाठी दुर्गामाता दौड काढण्यात आली. या दुर्गामाता दौडीची सांगता विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजनाने करण्यात आली. सावेडीतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक (प्रोफेसर कॉलनी) येथे शिव पूजन करून दुर्गामाता दौडला प्रारंभ झाला. या दौडीत शहर, भिंगार, केडगाव, तपोवन रस्ता, बोल्हेगाव, नवनागापूर गजानन कॉलनी आदी उपनगरातील धारकरी आणि महिला सदस्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
विविध देशभक्तीपर पद्य गात गात ही दौड तुळजाभवानीमाता मंदिर येथे पोचली. तेथे अरुण (बापू) ठाणगे यांच्या हस्ते श्री तुळजाभवानीमातेची आरती करण्यात आली. त्यानंतर शस्त्र पूजन करून या दौडीची सांगता झाली. या प्रसंगी श्री. ठाणगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
विजयादशमीचे अनोखे सीमोल्लंघन !
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सांगली, सातारा, कोल्हापूर प्रमाणे अहिल्यानगर मध्येही गेली ४ वर्षे दुर्गामाता दौड काढण्यात येते. सावेडी ते नवनागापूर आणि संभाजीनगर रस्ता ते भूतकरवाडी असा शहर आणि उपनगराचा सर्व विस्तारित भाग या वर्षी दुर्गामाता दौड मध्ये सहभागी करून घेण्यात आला होता. नवनागापूरच्या निमित्ताने दौडीने या वर्षी महापालिका हद्दही ओलांडली.
विजयादशमी सण हा ‘हिंदु संस्कृती रक्षण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्धार !नवरात्रोत्सवाच्या प्रारंभीच यावर्षीचा विजयादशमी सण हा ‘हिंदु संस्कृती रक्षण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्धार भारतीय संस्कृती रक्षण प्रतिष्ठान, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सनातन संस्था, इस्कॉन, नवनाथ संप्रदाय, स्वामी समर्थ महाराज, समस्त वारकरी संप्रदाय, सर्व संत-महंत शहर-उपनगरातील विविध मंदिरांचे पुजारी विश्वस्त आदींनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला होता. याचे प्रतिबिंब दुर्गामाता दौड आणि विजयादशमीच्या विशेष मिरवणुकीत स्पष्ट दिसले. महिला आणि पुरुष पारंपरिक वेशात आणि दंड घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. |