China-Pakistan On Kashmir : (म्‍हणे) ‘जम्‍मू-काश्‍मीरचे सूत्र द्विपक्षीय करारानुसार शांततेने सोडवावे !’ – चीन-पाक यांचे निवेदन

चीन-पाक यांचे द्विपक्षीय बैठकीनंतर निवेदन

चीनचे पंतप्रधान ली कियांग व पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

इस्‍लामाबाद (पाकिस्‍तान) – जम्‍मू-काश्‍मीरचा वाद इतिहासात शिल्लक आहे. हे संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या ठरारवाशी संबंधित आहे आणि ते द्विपक्षीय करारांनुसार शांततेने सोडवले जावे, असे संयुक्‍त निवेदन चीन आणि पाकिस्‍तान यांनी प्रसारित केले. येथे आयोजित शांघाय सहकार्य परिषदेसाठी चीनचे पंतप्रधान ली कियांग पाकिस्‍तानमध्‍ये पोचले. येथे त्‍यांची पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि राष्‍ट्रपती आसिफ झरदारी यांच्‍याशी वेगवेगळी द्विपक्षीय बैठक झाली. त्‍यानंतर पाक आणि चीन यांनी संयुक्‍तरित्‍या वरील निवेदन प्रसारित केले.

१. दोन्‍ही देशांनी दक्षिण आशियातील शांतता आणि स्‍थिरता राखण्‍याच्‍या महत्त्वावर अन् सर्व प्रलंबित विवादांचे निराकरण करण्‍याच्‍या गरजेवर भर दिला. तसेच कोणत्‍याही एकतर्फी कारवाईला विरोध केला, असेही या संयुक्‍त निवेदनात म्‍हटले आहे.

२. पाकमध्‍ये चीनच्‍या कर्मचार्‍यांवर झालेल्‍या आक्रमणाविषयी पाकचे राष्‍ट्रपती झरदारी म्‍हणाले, ‘‘पाकिस्‍तान आणि चीन यांची मैत्री ज्‍यांना खुपते ते चीन-पाकिस्‍तान आर्थिक महामार्ग आणि आमचे द्विपक्षीय संबंध यांना हानी पोचवण्‍याचा प्रयत्न करत आहेत; पण ते यशस्‍वी होणार नाहीत.’’ काश्‍मीर प्रश्‍नावर चीनने दिलेल्‍या समर्थनाबद्दल त्‍यांनी आभार मानले.

संपादकीय भूमिका

काश्‍मीर भारताचा अविभाज्‍य भाग आहे. त्‍यामुळे अन्‍य कुणीही याविषयी बोलू नये. भारताने चीनला जशास तसे उत्तर देण्‍यासाठी आता जागतिक व्‍यासपिठावर तिबेटच्‍या सूत्रावर बोलण्‍यास प्रारंभ करण्‍याची आवश्‍यकता आहे !