S Jaishankar Slams Pakistan : आतंकवाद आणि व्‍यापार एकत्र चालू शकत नाही !

भारताचे परराष्‍ट्रमंत्री जयशंकर यांनी इस्‍लामाबादमध्‍ये पाकिस्‍तानचे नाव न घेता सुनावले !

भारताचे परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

इस्‍लामाबाद (पाकिस्‍तान) – आतंकवादी कारवाया चालू राहिल्‍यास व्‍यापारालाही चालना मिळणार नाही, अशा शब्‍दांत भारताचे परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी पाकचे नाव न घेता त्‍याला सुनावले. ते येथे चालू असलेल्‍या ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्‍या (शांघाय सहकार्य परिषदेच्‍या) बैठकीत बोलत होते.

परराष्‍ट्रमंत्री म्‍हणाले की, आम्‍ही अशा वेळी भेटत आहोत, जेव्‍हा जग संकटातून जात आहे. २ मोठे संघर्ष चालू आहेत आणि त्‍यांचा संपूर्ण जगावर नकारात्‍मक परिणाम होत आहे. कोरोना महामारीचा अनेक विकसनशील देशांवर वाईट परिणाम झाला आहे. हवामानातील पालट, पुरवठा साखळीतील अनिश्‍चितता आणि आर्थिक कमकुवतपणा यांचा विकासावर परिणाम होत आहे. आपल्‍या संघटनेसमोर आतंकवाद, फुटीरतावाद आणि मूलतत्त्ववाद यांच्‍याशी लढण्‍याचे समान आव्‍हान आहे.

आत्‍मपरीक्षण करण्‍याची आवश्‍यकता ! – पाकला सुनावले

पाकिस्‍तानवर टीका करतांना डॉ. जयशंकर म्‍हणाले की, जर विश्‍वास किंवा सहकार्य यांचा अभाव असेल, तसेच मैत्री अल्‍प झाली असेल आणि चांगल्‍या शेजारीपणाची भावना हरवत असेल, तर नक्‍कीच आत्‍मपरीक्षण करण्‍याची आवश्‍यकता आहे. जेव्‍हा आपण वचनांचे पालन करण्‍यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, तेव्‍हाच आपल्‍याला परस्‍पर सहकार्य आणि वचनबद्धता यांचे लाभ पूर्णपणे जाणवू शकतात. ते केवळ आमच्‍या लाभासाठी नाही. जागतिकीकरण आणि पुनर्संतुलन हे वास्‍तव आहे, जे नाकारता येत नाही. यामुळे गुंतवणूक, व्‍यापार, ऊर्जा आणि इतर क्षेत्रांत सहकार्याच्‍या संधी निर्माण झाल्‍या आहेत. जर आपण ते पुढे नेले, तर त्‍याचा आपल्‍या क्षेत्राला पुष्‍कळ लाभ होईल. विकास आणि प्रगती यांसाठी शांतता अन् स्‍थिरता आवश्‍यक आहे. सीमेवर जर आतंकवाद, फुटीरतावाद आणि कट्टरतावाद असेल, तर व्‍यापार, ऊर्जा आणि लोकांशी संबंध वाढवणे कठीण होईल. लघु आणि मध्‍यम उद्योगांच्‍या सहकार्यामुळे रोजगाराच्‍या संधी निर्माण होतात. औद्योगिक समुदायाला मोठ्या संपर्काचा लाभ होतो. परस्‍पर संबंध नवीन मार्ग उघडू शकतात. पर्यावरण, हवामान पालट, आरोग्‍य क्षेत्र, अन्‍न आणि ऊर्जा या क्षेत्रांत सहकार्य यांची आवश्‍यकता आहे. तसेच, संस्‍कृती, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रांत पुष्‍कळ विकास होऊ शकतो आणि आपण मिळून बरेच काही करू शकतो. योग आणि भरड धान्‍य यांविषयी भारत सरकारच्‍या पुढाकारामुळे पर्यावरण सुधारण्‍यास साहाय्‍य होईल.

पाकने डॉ. जयशंकर यांच्‍या भाषणाचे थेट प्रक्षेपण थांबवले

पाकिस्‍तानचा भारतद्वेष या बैठकीत पुन्‍हा दिसून आला. भारताचे परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर बैठकीत बोलू लागल्‍यावर या बैठकीचे होणारे थेट प्रक्षेपण बंद करण्‍यात आले. त्‍यामुळे जगभरातील लोकांना डॉ. जयशंकर यांचे भाषण ऐकता आले नाही. वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्‍या यांनी नंतर दिलेल्‍या वृत्ताद्वारे जयशंकर काय म्‍हणाले, ते जगाला समजले.

डॉ. जयशंकर यांनी केला ‘मॉर्निंग वॉक’ !  

१६ ऑक्‍टोबरला डॉ. एस्. जयशंकर यांनी पाकिस्‍तानमधील भारतीय उच्‍चायुक्‍तालय परिसरात सकाळी मॉर्निंग वॉक केला.  याची छायाचित्रे जयशंकर यांनी सामाजिक माध्‍यमांवर शेअर केली.

त्‍यांनी एक्‍स वर पोस्‍ट करत लिहिले, ‘पाकिस्‍तानमधील भारतीय उच्‍चायुक्‍तालयाच्‍या पथकामधील सहकार्‍यांसमवेत आमच्‍या उच्‍चायुक्‍तालय परिसरात मॉर्निंग वॉक.’ डॉ. जयशंकर यांनी उच्‍चायुक्‍तालयाच्‍या आवारात अर्जुन वृक्षाचे रोपटे लावले.