उच्च न्यायालयाकडून याचिका निकालात प्रा. सुभाष वेलिंगकर यांना अटकपूर्व जामीन संमत
फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्याचे प्रकरण
पणजी, १५ ऑक्टोबर (वार्ता.) – फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्यावर गुन्हा नोंद झाल्यावर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केलेली याचिका उच्च न्यायालयाने निकालात काढली असून प्रा. सुभाष वेलिंगकर यांना अटकपूर्व जामीन संमत करण्यात आला आहे, अशी माहिती प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या अधिवक्त्यांनी दिली आहे. या प्रकरणी हस्तक्षेप याचिका प्रविष्ट करणार्यांकडून प्रा. वेलिंगकर हे डिचोली पोलीस ठाण्यात चौकशी अधिकार्यांसमोर उपस्थित राहिल्याने त्यांना अटक करणे आणि अटकपूर्व जामीन देणे, याचा प्रश्नच येत नाही, असा युक्तीवाद करण्यात आला.
अतिरिक्त जिल्हा न्यायाधिशांनी प्रा. सुभाष वेलिंगकर यांना अटकपूर्व जामीन नाकारतांना नोंदवलेली निरीक्षणे नोंदीतून काढून टाकावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. (ही प्रा. वेलिंगकर यांच्या विरोधकांना चपराकच आहे ! – संपादक) या खटल्यासंबंधीचा पूर्ण आदेश पुढील १ दिवसात उच्च न्यायालयाकडून प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यामध्ये या प्रकरणाच्या स्थितीविषयीची सविस्तर माहिती असेल. यासंबंधी अन्वेषण चालू असून प्रा. वेलिंगकर यांना अन्वेषणासाठी सहकार्य करण्यास सांगण्यात आले आहे.